महाविद्यालयामुळे जीटी रुग्णालयाला नवी उभारी
महाविद्यालयामुळे जीटी रुग्णालयाला नवी उभारी
भविष्यात स्वतंत्र अतिदक्षता विभाग; ओपीडी रुग्णसंख्या वाढली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : दीड ते दोन वर्षांपूर्वी अडगळीत गेलेले जीटी रुग्णालय आता वैद्यकीय महाविद्यालयामुळे नवीन उभारी घेत आहे. आता रुग्णसंख्या वाढली असून आधुनिक सुविधा सुरू झाल्यामुळे रुग्णसेवेला वेग आला आहे. नव्या आपत्कालीन विभागापासून शस्त्रक्रियांसाठीच्या आधुनिक शल्यक्रियागृहापर्यंत अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले गेले आहेत.
रुग्णालयात पहिल्यांदाच अपघात विभागाशेजारी आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. अपघातग्रस्त किंवा गंभीर रुग्णांना भरतीपूर्वी येथे प्राथमिक व आपत्कालीन उपचार दिले जात आहेत. रक्त तपासणी, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध असून, रुग्णाला तातडीने स्थिर करण्याची सुविधा तयार केली आहे. यामुळे उपचारांचा दर्जा सुधारला आहे.
शस्त्रक्रियांसाठीच्या नव्या शल्यक्रियागृहाचे काम सुरू असताना रुग्णालयातील उपचार ठप्प पडू नयेत, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जुना अतिदक्षता विभाग शल्यक्रियागृहामध्ये रूपांतरित करून वापरात आणला आहे. येथे एकावेळी चार टेबलांवर शस्त्रक्रिया सुरू असून, दिवसाला सरासरी २५० ते ३०० शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. भूलतज्ज्ञांची समस्या कायमची मार्गी लावण्यात आली असून, निवासी डॉक्टर व इंटर्न यांच्या मदतीने शस्त्रक्रिया वेळेत पूर्ण होत आहेत.
बाह्यरुग्ण संख्या वाढली
बाह्यरुग्ण विभागामधील रुग्णसंख्याही वाढली आहे. पूर्वी दररोज ३०० ते ३५० रुग्ण तपासणीसाठी येत होते, तर आता ही संख्या ४०० ते ४५० पर्यंत पोहोचली आहे. काही दिवसांत तर ही संख्या ६०० वर जाईल. रुग्णभार वाढला असला तरी उपचाराची गती मंदावलेली नाही. उलट वैद्यकीय सेवेत सातत्य ठेवण्यासाठी डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक निर्माण करण्यात आले आहे.
एमआरआय-सीटीस्कॅन यंत्रणा
रुग्णालयात नवीन एमआरआय व सीटी स्कॅन यंत्रणा बसवण्यात आली आहे. ‘३ टेस्ला एमआरआय’सारखे अत्याधुनिक उपकरण येथे उपलब्ध आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणखी एक एमआरआय मशीन मागवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रुग्णांना वेळेत तपासणी मिळावी, यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय सांध्याची तपासणी संच, प्लॅस्टिक सर्जरीसाठी मायक्रोसोम, रेटिनाच्या शस्त्रक्रियेसाठी लेझर यंत्रणा यांची मागणी करण्यात आली आहे. ही उपकरणे मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने प्रशिक्षण घेणे सोपे होईल.
२० बेडचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग
भविष्यातील प्रकल्पांमध्ये २० बेडचा स्वतंत्र अतिदक्षता विभाग, पाच बेडचे डायलिसिस युनिट आणि अत्याधुनिक कॅथलॅब उभारण्याचे नियोजन आहे. या तिन्ही प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रुग्णालयात हृदयविकारासह गंभीर आजारांच्या उपचाराची क्षमता वाढेल.
भविष्यातील सुविधा
याशिवाय महाविद्यालयीन परिषदेसाठी किंवा कार्यक्रमासाठी प्रशस्त ‘कौन्सिल हॉल’ आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व्याख्यान कक्ष उभारण्यात येत आहे. यामध्ये द्रक-श्राव्य साधने, एलईडी स्क्रीन व वातानुकूलित सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच मॉड्युलर किचन उभारण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी स्वच्छ, पौष्टिक व गरम जेवण वेळेत उपलब्ध होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.