
मुंबईत घटस्थापनेची लगबग जोरात
दुर्गोत्सवासाठी मंडळांची तयारी अखेरच्या टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : यंदा सोमवारी (ता. २२) घटस्थापना होणार आहे. मुंबईत घटस्थापनेसाठीची लगबग आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली असून अनेक जण घरीही देवीची स्थापना करू लागल्याचे मूर्तिकार सांगत आहेत; मात्र गतवर्षीच्या तुलनेत या वेळी देवीच्या मूर्तींची मागणी २० ते २५ टक्क्यांनी वाढली आहे. पर्यावरणपूरक मूर्तीला फारशी मागणी नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
गणेशोत्सवानंतर नवरात्रीचे वेध लागतात. घटस्थापनेच्या दिवशी दुर्गेच्या रूपातील देवींचे आगमन होणार असून मूर्ती कार्यशाळेत मूर्तिकाराची मूर्ती घडविण्याची लगबग वाढली आहे. अवघे काही दिवस शिल्लक असल्याने मूर्तिकार मूर्तीला शेवटचा आकार देण्यात गुंतले आहेत. घटस्थापनेसाठी मुंबईतील सार्वजनिक दुर्गा मंडळांचीही जय्यत तयारी सुरू आहे. स्त्री रूपातील मूर्ती घडवताना डोळे, चेहरा, स्मितहास्य यावर बारकाईने काम केले जात आहे. देवीच्या मूर्तींना आर्टिफिशियल पापण्या, हिऱ्यांची सजावट, यासह रंगरंगोटीचे काम शेवटच्या टप्प्यात आल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
५०वे वर्षे
विक्रोळी स्थानकालगत असणाऱ्या बाबा गुडेकर कंपाउंड नवदुर्गा मंडळांचे यावर्षी ५०वे वर्ष आहे. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची आख्यायिका आहे. मूर्तिकार संदीप श्रीवर्धनकर हे दरवर्षी देवीचे रंगकाम करतात. गेली २२ वर्षे स्थापित देवीच्या मूर्तीला नऊ दिवस वेगळ्या रंगांची साडी नेसली जाते. शिवाय, नवचंडी होम केला जातो. जागरण, गोंधळ असा एकूण कार्यक्रम महिलांसाठी विशेष राबवले जातात, असे मूर्तिकार संदीप श्रीवर्धनकर यांनी सांगितले.
फोर्टच्या आईचा थाट
फोर्टची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीचा या वेळी वेगळाच थाट पाहायला मिळणार आहे. चनियाचोलीचा पेहराव असलेली ही देवी तिच्या सौंदर्याने भक्तांना भुरळ घालते. देवीचे हे रूप पाहण्यासाठी नऊ दिवस भक्तांची मोठी गर्दी असते, असे फोर्टची आई नवरात्रोत्सव मंडळाचे सदस्य योगेश वाघेला यांनी सांगितले. मुंबईतील अनेक मोठ्या मंडळाच्या देवींची २० तारखेला स्थापना होणार आहे. सातरस्ता माउली म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बाळगोपाळ नवरात्रोत्सव मंडळांची माउली पाहण्यासाठी हजारो लोक गर्दी करतात. दागिने, हार, गजऱ्याने नटलेली देवी भक्तांचे मन जिंकते.
यंदा देवीच्या मूर्तींना मागणी वाढलेली नाही. यावर्षी फायबर आणि पीओपीच्या मूर्ती घडवल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते २५ टक्के वाढली आहे. दरवर्षी ही मागणी ५० टक्क्यांनी वाढते.
- निळकंठ राजम, मूर्तिकार, घाटकोपर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.