आजपासून माऊंटमेरी जत्रा

आजपासून माऊंटमेरी जत्रा

Published on

आजपासून माउंट मेरी जत्रा
भाविकांच्या स्वागतासाठी चर्च सज्ज; पोलिस, पालिकेकडून जय्यत तयारी

मयूर फडके : सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : माउंट मेरी म्हणजेच मोत माउलीच्या जत्रेला आजपासून सुरुवात होत आहे. या जत्रेला वांद्रे महोत्सव असेही म्हटले जाते.  रविवार (ता. १४) ते रविवार (ता. २१)पर्यंत जत्रा सुरू असणार आहे. या जत्रेला १०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. येथे दरवर्षी हजारो भाविक भेट देतात. माउंट मेरी चर्चमध्ये नवस मागण्यासाठी तथा मेणबत्ती लावून नवस फेडण्यासाठी भाविक गर्दी करतात. यंदाच्या वर्षी एक लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता चर्च व्यवस्थापनाकडून वर्तवण्यात आली आहे.

यंदा  बॅसिलिका ऑफ अवर लेडी ऑफ द माउंट मेरीच्या प्रत्येक प्रार्थनासभेत दीड हजारांहून अधिक भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. बॅसिलिकाच्या बाहेरील शामियानामध्येही सुमारे एक हजार ३०० भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था केल्याची माहिती बॅसिलिकाचे व्हाइस रेक्टर फादर सुंदर अल्बुकर्क यांनी दिली. सोमवारी (ता. ८) मेरीच्या जन्माचा उत्सव साजरा केला तेव्हा सुमारे १६,००० भाविक चर्चमध्ये उपस्थित होते. तथापि, आठवडाभर चालणाऱ्या या जत्रेत सुमारे एक लाख भाविक येण्याची शक्यता असल्याचे फादर सुंदर सांगतात.

ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
पालिकेसह पोलिस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभागाने जत्रेचे नियोजन खूप गांभीर्याने घेतले आहे. पोलिस, वाहतूक आणि अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कुठल्या प्रकारची दुर्घटना घडू नये किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी ते सज्ज आहेत, अशी माहिती फादर सुंदर यांनी दिली. चर्च प्रशासनाकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्थापनाने स्वयंसेवक नेमले आहेत. भाविकांना रांगेतून कोणत्याही त्रासाविना दर्शन घेता यावे, पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी छप्परची तथा दुरून दर्शन घेणाऱ्यासाठी टीव्हीची यासोबतच पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची सोयही केल्याची माहिती फादर सुंदर यांनी दिली.

चर्चच्या नव्या रूपाचे आकर्षण
जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेले जीर्णोद्धार आणि नूतनीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. आता चर्च नव्या रूपात भाविकांना पाहता येणार आहे. नवीन रंग, नवा साज हा भाविकांसाठी खास आकर्षण असणार आहे, असे फादर सुंदर सांगतात.

दुकाने सजली
माउंट मेरी चर्चबाहेर मेणबत्या, हार, फुलांची, विविध भेटवस्तूंची दुकाने सजली आहेत. आपला नवस पूर्ण करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. मेणबत्या अर्पण करून नवस फेडतात. माउंट मेरीची जत्रा म्हणजे खवय्यांसाठी एकप्रकारची मेजवानी असते. महाराष्ट्रासह गोवा, केरळ, दिल्ली येथील पदार्थाची चव चाखायला मिळते. खाजा, सोनपापडी, सुतरफेणी, कलाकंद, पेढे तर केरळी वेफर्स, चकली, केरळी हलवा अशा विविध पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे.

पुढील १० दिवस माउंट मेरीच्या दर्शनासाठी या आणि शांती मिळवा.
-  फादर सुंदर अल्बूक


आम्ही मागील १५ वर्षांपासून या जत्रेत स्टॉल लावत आहोत. दरवर्षी न चुकता आमचे ग्राहक येथे येऊन आमच्या तुळजापुरातील पेढे घेऊन जातात. आमच्याकडील पेढ्यासह कलाकंद आणि मावा मलाईलाही खूप मागणी असते.
- राजाराम देवरे, तुळजापूर


जत्रेत वर्षानुवर्षे मेणबत्यांचा व्यवसाय करतो. माझे वडील स्वतः १० वर्षांचे असल्यापासून येथे दुकान लावतात. वेगवेगळ्या प्रकारचे नवस बोलले जातात. त्याप्रमाणे मेणबत्यांना मागणी असते. सर्वाधिक पांढऱ्या मेणबत्यांचा खप असतो.
- इशिका, स्थानिक दुकानदार

१९८९ पासून आम्ही येथे देवीच्या जत्रेत स्टॉल लावत आहोत. पहाटे पाच वाजता स्टॉल लावावा लागतो. १० दिवस येथील वातावरण भक्तिभावाने फुललेले असते.
- मोहन परदेशी, स्थानिक दुकानदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com