वन्यजीव गणनेनंतरच आराखडा बनवा!

वन्यजीव गणनेनंतरच आराखडा बनवा!

Published on

वन्यजीव गणनेनंतरच आराखडा बनवा!
राष्ट्रीय उद्यानाच्या मसुद्यावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासाठी तयार केलेल्या महापालिकेच्या मसुद्यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी निदर्शनास आणले आहे. वन्यजीव गणनेनंतरच आराखडा तयार करण्यात यावा, असा आक्षेप नोंदवत त्यावर विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘सेव्ह आरे’चे कार्यकर्ते संजीव वाल्सन यांनी परिसरातील मूळ आदिवासी आणि त्यांच्या जमिनीबाबत चिंता व्यक्त केली. कोणतीही विकासकामे करताना येथील मूळ रहिवाशांना त्यात समाविष्ट करणे गरजेचे आहे. तसेच परिसरातील अतिक्रमणावरील कारवाईबाबत विचार झाला पाहिजे, असे ते म्हणाले. २०११ पासून उद्यानातील प्रमुख वन्यप्राण्यांची सविस्तर जनगणना झालेली नाही. त्यामुळे एसईझेडमधील विकास, जमिनीचा वापर, बांधकामे किंवा पायाभूत सुविधांबाबत योग्य निर्णय घेणे अशक्य असल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त ॲड. गॉडफ्रे पिमेंटा व निकोलस आल्मेडा यांनी सांगितले.
मसुदा आराखड्यानुसार उद्यानाच्या संवेदनशील क्षेत्रात २५६ हेक्टर निवासी, १८४ हेक्टर झोपडपट्टी, १३८ हेक्टर व्यावसायिक व १४६ हेक्टर औद्योगिक क्षेत्र आहे. घोडबंदर रोड, मिरा-भाईंदर, वसई-विरार परिसरातील रेडीमिक्स काँक्रीट आणि कास्टिंग यार्डमुळे पर्यावरणीय हानी होत आहे. या प्रकल्पांवर राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने (एनजीटी) बंदी घालण्याचे आदेश दिले असूनही ते सुरू आहेत. मिरा गाव, दहिसर व चेन क्रीक भागातील रिसॉर्ट व स्टुडिओंमुळे प्रदूषण वाढत आहे. झाडे व झुडपे नष्ट करण्यासाठी लावलेल्या आगीमुळे वनसंपदेचे नुकसान होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
----
तज्ज्ञांच्या सल्ल्याविना मंजुरी नको!
आराखड्यात वैज्ञानिकदृष्ट्या समर्थित बफर झोन किंवा वन्यजीव कॉरिडॉरचा समावेश नाही, ही मोठी उणीव आहे. वनस्पती, प्राणी, जलस्रोत आणि स्थलांतर मार्गांचा अभ्यास करूनच मास्टर प्लीन तयार व्हावा, अशी मागणी करण्यात आली. तज्ज्ञ पर्यावरणशास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक व जलवैज्ञानिकांचा सल्ला घेतल्याशिवाय हा आराखडा अंतिम करू नये, अशी ठाम भूमिका वॉचडॉग फाउंडेशनने घेतली आहे.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com