मुंबई टुडेसाठी ........मुंबई महापालिका शाळांतील ऑनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह
ऑनलाइन शिक्षणावर प्रश्नचिन्ह
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडे संगणक, स्मार्टफोनची सुविधा नाही; कार्यवाहीसाठी शिक्षकांना मनस्ताप
संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत; मात्र सहावी ते आठवीच्या प्रत्येक शाळांतील विशेषत: गणित, विज्ञान विषयावर अधिकचे वर्ग घेण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या खान अकॅडमी प्रकल्पावर बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेसह पालक, शिक्षणतज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ऑनलाइन शिक्षणाच्या या प्रकल्पात पालक, विद्यार्थी आणि एकूणच शाळांतील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचला आहे. याबाबतचे पत्र महापालिकेच्या शिक्षण उपायुक्त प्राची जांभेकर यांना पाठवले आहे. या पत्रात महापालिका शाळांमध्ये सध्या खान अकॅडमी नावाचा विज्ञान, गणित या विषयांचा ऑनलाइन प्रकल्प राबविला जात आहे, या प्रकल्पामुळे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांवर कामाचा मोठा ताण निर्माण झाला आहे. याच ताणामुळे नियमित अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असून यासाठी असलेल्या त्रुटींवर शिक्षक सभेने लक्ष वेधले आहे.
मुंबई महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले बहुसंख्य विद्यार्थी वंचित, कामगार, कष्टकरी आदी घटकातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे खान अकॅडमीच्या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी संगणक, चांगल्या दर्जाचे स्मार्टफोन आदींची कोणतीच सुविधा नाही. अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती ही प्रतिकूल असल्याने त्यांना तांत्रिक साधने उपलब्ध करून देणे शक्य नाही. शिवाय शिक्षकांवर नियमित अध्यापन आणि अध्ययनाची, विविध उपक्रमांची कामे आणि त्यांचा खूप मोठा व्याप असून त्यांच्यावर या ऑनलाइन उपक्रमामुळे मोठा ताण सहन करावा लागत आहे. अनेक शिक्षक हे मानसिक तणावाखाली असल्याने त्यांच्यावर हा उपक्रम लादणे अन्यायकारक असल्याचे बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी पत्रात नमूद केले आहे.
--
साधने उपलब्ध करून द्या
मुंबई महापालिकेच्या एक हजार ११८ शाळांमध्ये तीन लाख १० हजार ४२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी तांत्रिक साधने, इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे प्रशासनाने गणित, विज्ञान या विषयांतील ऑनलाइन शिक्षणाचा उपक्रम राबविताना आधी विद्यार्थ्यांसह शिक्षक, मुख्याध्यापकांनाही तशी साधने उपलब्ध करून देण्यात यावीत आणि जे शिक्षक यात सहभागी होऊ शकत नाहीत, त्यांना पाठविण्यात येणाऱ्या नोटिसा तत्काळ थांबवाव्यात, अशी मागणीही शिक्षक सभेने केली आहे.
--
ऑनलाइन उपक्रमात उपस्थिती कमी
विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार खान अकॅडमीच्या ऑनलाइन शिक्षणाच्या उपक्रमात ऑगस्ट २०२५ अखेर अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी झाली नाही. काही शाळांमध्ये ७० तर काहींमध्ये ४०, १५, १७ टक्के अशी नोंदणी झाल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मुंबईतील अनेक शाळांमध्ये हे ऑनलाइन शिक्षण सुरूच झालेले नाही. यात जे. जे. हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल, आगरीपाडा, कामाठीपुरा, तसेच परळमधील काही शाळांचा समावेश आहे.
असे आहेत विद्यार्थी
महापालिकेच्या सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान हे विषय व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने शिकवले जात आहेत. तर सध्या या वर्गांपैकी इयत्ता सहावीत ३३ हजार २९२, इयत्ता सातवीत ३२ हजार २३१ आणि इयत्ता आठवीत १४ हजार २२४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
---
शाळांची एकूण माहिती
२०२४-२५ वर्ष (नुसार)
महापालिकेच्या एकूण एक हजार ११८ शाळा कार्यरत असून यामध्ये सध्या तीन लाख १० हजार ४२६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर त्यासाठी एकूण आठ हजार ६३० हून अधिक शिक्षक अध्यापनाचे कार्य करीत आहेत. यात अलीकडे काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती झाल्याने ही संख्या वाढली आहे.