डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप
डॉक्टरांच्या संघटनांचा १८ सप्टेंबरला संप
होमिओपॅथी-ॲलोपॅथी प्रकरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिल्याच्या निर्णयाला ॲलोपॅथी डॉक्टरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी)मध्ये स्वतंत्र नोंदणीची प्रक्रिया १७ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) १८ सप्टेंबरला एक दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. या संपाला राज्यातील तब्बल एक लाख ८० हजार ॲलोपॅथी डॉक्टरांनी पाठिंबा दिला असून, गुरुवार सकाळी ८ पासून शुक्रवार सकाळी ८ पर्यंत खासगी रुग्णालये, नर्सिंग होम आणि क्लिनिक बंद राहणार आहेत. यासंदर्भात रविवारी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षांनी बैठक घेऊन माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यातील सर्व ॲलोपॅथिक डॉक्टर (एमबीबीएस, एमडी, एमएस, डीएम, एमसीएच सर्व स्पेशालिस्ट) गुरुवारी सर्व वैद्यकीय सेवा बंद करून संपावर जाणार आहेत. आयएमएची कोर्ट केस उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिल्याचा निर्णय नव्याने महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ५ सप्टेंबर रोजी बेकायदा आदेश पुन्हा लागू करून एमएमसीवर नोंदणी सुरू करण्याचे नव्याने आदेश दिले आहेत. याच्या निषेधार्थ ऑलोपॅथिक डॉक्टर संपावर जाणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनने घोषित केले.
....
विविध संघटनांचा पाठिंबा
बॉम्बे नर्सिंग होम, महाराष्ट्र सीनियर रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन, सरकारी रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी संघटना, महापालिका मार्ड, महाराष्ट्र ऑफ्थॅल्मोलॉजिकल सोसायटी, इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांसह अनेक वैद्यकीय संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी सांगितले की, फक्त एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करून होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचारांची मुभा देणे धोकादायक आहे. आपत्कालीन परिस्थितीत चुकीचे निदान किंवा चुकीची औषधे रुग्णासाठी जीवघेणी ठरू शकतात.
...
देशव्यापी आंदोलन छेडले जाईल!
निर्णयाचा पुनर्विचार न झाल्यास देशव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अक्षय डोंगरदिवे यांनी दिला आहे.
....
एमएसआरडीएचाही पाठिंबा
महाराष्ट्र स्टेट सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (एमएसआरडीए)कडून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यातील सर्व सीनियर रेसिडेंट डॉक्टर प्रतीकात्मक एकदिवसीय संप करतील व सर्व ऐच्छिक सेवा बंद करतील, असा इशारा दिला आहे.
...
नोंदणी तातडीने रद्द करावी!
सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी तातडीने रद्द करावी व फक्त एमबीबीएस पात्र डॉक्टरांनाच आधुनिक वैद्यक व्यवसायाची परवानगी द्यावी. आरोग्यसेवेत होणाऱ्या अडचणीची संपूर्ण जबाबदारी सरकारवर राहील, असा आग्रह एमएसआरडीएने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.