मोकळ्या जागा भाडेतत्वावर देण्यास विरोध

मोकळ्या जागा भाडेतत्वावर देण्यास विरोध

Published on

मोकळ्या जागा भाडेतत्त्वावर देण्यास विरोध
तात्पुरत्या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : शहरातील झपाट्याने कमी होत असलेल्या मोकळ्या जागांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेने आणलेले तात्पुरते धोरण तत्काळ स्थगित करावे, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष व अंधेरी (पश्चिम) मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिले आहे.
आमदार साटम यांनी स्पष्ट केले की, शहरातील एकही मोकळी जागा खासगी संस्था, ट्रस्ट किंवा संघटनांना देऊ नये. उलट या जागांची देखभाल पालिकेनेच करावी. तसेच जाहिरातींमधून महसूल उभारून देखभाल खर्च भागवावा, असेही त्यांनी सुचवले आहे.
महापालिकेचे सध्याचे धोरण तात्पुरते असून, ११ महिन्यांच्या करारावर खासगी संस्थांना मोकळ्या जागा देण्याची तरतूद आहे. त्‍यामुळे जागा कायमस्वरूपी हडप होण्याची किंवा क्लब-जिमखान्यात रूपांतर होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे हे धोरण नागरिकांच्या भावनांचा विचार न करता आणले असल्याचा आरोप साटम यांनी केला.
अंधेरी पश्चिम मतदारसंघात ६० हून अधिक मोकळ्या जागांचा विकास करून त्या पालिकेकडूनच देखभाल केली जाते, हे उदाहरण देत साटम यांनी महापालिकेला इशारा दिला की, एकदा खासगी ट्रस्टला जागा दिली, तर त्यांना बाहेर काढणे कठीण होते.
धोरण अंतिम होण्यापूर्वी काही ट्रस्ट व खासगी संस्था हितसंबंध साधण्यासाठी अर्ज करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नवीन धोरण नागरिक-अनुकूल तयार होईपर्यंत कोणत्याही मोकळ्या जागांचे वाटप करू नये, अशी मागणी साटम यांनी पत्राद्वारे केली आहे. सर्व मोकळ्या जागांची देखभाल महापालिकेने स्वतःकडे ठेवावी. जाहिरातींच्या माध्यमातून महसूल निर्माण करावा, पण जागा खासगी संस्थांकडे देऊ नये, अशी मागणी साटम यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com