विमानातून होणारी तस्करी वन्यजीवांच्या जीवावर

विमानातून होणारी तस्करी वन्यजीवांच्या जीवावर

Published on

विमानातून होणारी तस्करी वन्यजीवांच्या जीवावर
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई; ६७ दुर्मिळ वन्यजीव जिवंत अवस्थेत जप्त
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा मोठा वन्यजीव तस्करीचा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. रविवारी (ता. १५) पहाटे सीमा शुल्क विभागाने एका भारतीय प्रवाशाला थांबवून त्याच्या सामानातून तब्बल ६७ जिवंत आणि दुर्मिळ वन्यजीव जप्त केले. हे सर्व प्राणी बँकॉकमधून गुपचूप भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान, यातील चार पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांच्या मते, जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये लेपर्ड टॉर्टोइस, विविध प्रकारची कासवे, मीरकॅट, हायरॅक्स, शुगर ग्लायडर, मॉनिटर लिझर्डसच्या संकटग्रस्त प्रजाती यांचा समावेश आहे. हे सर्व प्राणी अतिशय नाजूक अवस्थेत सापडले. त्यातील चार पोपटांसह काही अन्य पक्ष्यांचा प्रवासादरम्यान श्वसनाच्या त्रासामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.
सीमा शुल्क विभागाच्या कारवाईनंतर त्वरित रेस्क्यू असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या संस्थेच्या तज्ज्ञांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने सर्व प्राण्यांची सुटका करण्यात आली. ओळख, प्राथमिक उपचार आणि स्थिरीकरण यासाठी प्रयत्न झाले. अनेक प्राण्यांची प्रकृती चिंताजनक होती, तरी तज्ज्ञांच्या हस्तक्षेपामुळे बहुतांश प्राणी वाचले.
घटनेनंतर वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवला. कायद्याच्या तरतुदीनुसार सर्व प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधित विमानसेवेच्या माध्यमातून सर्व जिवंत प्राण्यांचे तातडीने डिपोर्टेशन करण्यात आले.
सीमा शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे मुंबईतून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाला आहे. मुंबई विमानतळ हा तस्करांसाठी एक प्रमुख मार्ग मानला जातो. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, पुढील काळात अशा घटनांना आळा बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, परदेशी व दुर्मिळ प्राणी हे पाळीव प्राण्यांच्या काळ्या बाजारात प्रचंड किंमत मिळवतात. त्यामुळे अनेक तस्कर त्यांना अमानवी पद्धतीने लपवून देशात आणतात. प्रवासादरम्यान हवा न मिळणे, पाण्याचा अभाव आणि भीतीमुळे अनेक प्राण्यांचा मृत्यू होतो. या घटनेने पुन्हा एकदा वन्यजीवांच्या तस्करीमुळे होणाऱ्या क्रूर वास्तवाची जाणीव समोर आली आहे.

६७ दुर्मिळ प्राण्यांना बॅगमध्ये कोंबून आणणे म्हणजे जिवंतपणी मरणयातना देण्यासारखे आहे. काही निरपराध पक्ष्यांचा मृत्यू हा मानवी लालसेचा परिणाम आहे. यातील काही पक्षी, प्राण्यांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला. केवळ पैशासाठी प्राण्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही असा गुन्हा करण्याचे धाडस करणार नाही.
- पवन शर्मा, प्राणिमित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com