मध्य रेल्वेवर ‘कवच’ची चाचणी यशस्वी
मध्य रेल्वेवर ‘कवच’ची चाचणी यशस्वी
सोलापूर विभागात प्रथमच परीक्षण; प्रवासी सुरक्षेला नवी ताकद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : प्रवासी सुरक्षेच्या दिशेने मध्य रेल्वेने ऐतिहासिक पाऊल उचलत ‘कवच’ या स्वदेशी सुरक्षा प्रणालीची पहिली यशस्वी चाचणी केली. रविवारी (ता. १४) सोलापूर विभागातील ढवलस ते भालवनी या २६ किलोमीटरच्या पट्ट्यात लोको परीक्षण पार पाडण्यात आले.
महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी झाली. या वेळी प्रधान मुख्य सिग्नल व दूरसंचार अभियंता मनिंदर सिंग उप्पल, सोलापूर विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिग्नल पासिंग एट डेंजर (एसपीएडी) टाळणे, ब्लॉक सेक्शन व स्टेशन मास्टरकडून आपत्कालीन संदेश (एसओएस) जनरेशन, तसेच टर्नआऊटवर वेग नियंत्रण या महत्त्वाच्या सुरक्षा चाचण्या घेण्यात आल्या.
कुर्डुवाडी येथे मध्य रेल्वेचे पहिले ‘कवच’ सिम्युलेशन लॅब व प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित झाले असून, यामुळे लोको पायलट आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष सराव करता येणार आहे. ‘सोलापूर विभागातील ही यशस्वी चाचणी हा प्रवासी सुरक्षेच्या बळकटीकरणाचा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतीय रेल्वेची सुरक्षितता आणि आधुनिकीकरण यावर आमचे सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत,’ असे धर्मवीर मीना यांनी या वेळी सांगितले.
अवघ्या सहा महिन्यांत कामगिरी
मध्य रेल्वेवर मार्च २०२५ मध्ये ‘कवच’ प्रणालीसाठी निविदा मंजूर झाली होती. अवघ्या सहा महिन्यांत लोको चाचणी पूर्ण करणे ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. दरम्यान, भुसावळ विभागात एकात्मिक कवच नियंत्रण केंद्र सुरू झाले असून, तेथून १३४ ठिकाणांवरील प्रणालीवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.
प्रवासी सुरक्षेत मध्य रेल्वे अग्रेसर
‘कवच’ ही भारतीय रेल्वेची स्वदेशी स्वयंचलित सुरक्षा प्रणाली असून, ती ट्रेन धोकादायक सिग्नलवरून पुढे जाण्यापासून रोखते, धडक टाळते आणि वेग नियंत्रणात ठेवते. स्टेशन उपकरणे आणि इंजिन यामधील रेडिओ लिंकद्वारे वास्तववेळेची माहिती देवाणघेवाण करून ही प्रणाली कार्य करते. प्रवासी सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये मध्य रेल्वे आता देशात अग्रणी ठरली आहे.
ग्राफिक्स-
‘कवच’ म्हणजे काय?
- भारतीय रेल्वेची स्वदेशी स्वयंचलित सुरक्षा प्रणाली
- ट्रेन धोकादायक सिग्नलवरून पुढे जाण्यापासून थांबवते
- टक्कर टाळते, ओव्हरस्पीड रोखते
- स्टेशन आणि इंजिन यामध्ये रेडिओ लिंकद्वारे माहितीची देवाणघेवाण
- वास्तव वेळेत वेग आणि मूव्हमेंट अथॉरिटीचे नियंत्रण
---
काय तपासले?
- एसपीएडी (सिग्नल पासिंग एट डेंजर)
- ब्लॉक सेक्शन एसओएस
- स्टेशन मास्टर एसओएस
- टर्नआऊटवर वेग मर्यादा
---
आतापर्यंत काय झाले?
- मार्च २०२५ मध्ये निविदा मंजूर
- अवघ्या सहा महिन्यांत यशस्वी चाचणी
- ७३० लोकोमध्ये ‘कवच’ बसवण्यास मंजुरी
- भुसावळमध्ये एकात्मिक नियंत्रण केंद्र सुरू (१३४ ठिकाणांवर नियंत्रण)
- कुर्डुवाडीत पहिले प्रशिक्षण केंद्र सुरू
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.