नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान

Published on

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान
लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ राज्यभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात १० लाखांहून अधिक नागरिकांची मोफत नेत्रतपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत. या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून, काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचारदेखील मोफत केले जाणार आहेत.

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये तालुका व गावपातळीवर नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील. या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.

तळागाळातील नागरिकांसाठी मोठा दिलासा
नेत्ररोग उपचाराचा खर्च गरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे. या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.

गरजू रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन
प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत लाभ पोहोचण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यामुळे लाखो रुग्णांवर मोफत नेत्रतपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिराचा लाभ राज्यातील गरजू रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com