राज्यातील ६० लाख मुलांना असंसर्गजन्य आजार
राज्यातील ६० लाख मुलांना असंसर्गजन्य आजार
मधुमेह, दमा, सिकलसेल, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : राज्यात मधुमेह, उच्च रक्तदाब आदी असंसर्गजन्य आजार (एनसीडी) पूर्वी वयाच्या तिशीनंतर होत असे. आता मात्र लहान मुलांमध्येही या आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यातील सुमारे ६० लाखांहून अधिक मुले असंसर्गजन्य आजारांनी त्रस्त असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
असंसर्गजन्य आजाराने ग्रस्त मुलांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्य आरोग्य विभागासह युनिसेफ आणि पीआयबी यांच्या वतीने नुकतीच मुंबईत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या वेळी आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी आतापर्यंत प्रौढांमध्ये दिसणारे असंसर्गजन्य आजार आता लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढत असल्याने समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या कार्यशाळेला पीआयबी पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, एम्स नागपूरच्या मुख्य संचालक डॉ. प्रशांत जोशी, युनिसेफ महाराष्ट्राचे प्रमुख संजय सिंह आणि विवेक सिंह उपस्थित होते.
----
७१ टक्के मृत्यू ‘एनसीडी’मुळे!
जगभरातील एकूण मृत्यूंपैकी ७१ टक्के मृत्यू ‘एनसीडी’मुळे होतात. भारतात तीनपैकी दोन मृत्यू या आजारांमुळे होतात. महाराष्ट्रात टाइप-१ मधुमेहाचे सुमारे दोन हजार नवीन रुग्ण आणि जन्मजात हृदयरोगाचे २० ते २५ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ३३ लाख मुले दम्याने ग्रस्त आहेत आणि ८८ लाख मुले मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. राज्यात बालपणातील स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे आणि ६० लाखांहून अधिक मुले जास्त वजनाची आहेत.
....
तज्ज्ञांनी काय सूचवले?
कार्यशाळेतील चर्चेदरम्यान, बालपणातील असंसर्गजन्य आजारांना तोंड देण्यासाठी आरोग्यविषयक तज्ज्ञांनी अनेक उपाय सूचवले. यामध्ये शाळेत आरोग्य तपासणी, इन्सुलिन आणि इनहेलरसारख्या औषधांची मोफत तरतूद, जिल्हास्तरीय एनसीडी क्लिनिकची स्थापना आणि शिक्षण व्यवस्थेत मानसिक आरोग्य सहाय्य समाविष्ट करणे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.