आझाद मैदानाशेजारील खाद्यपदार्थ स्टॉल्सधारकांना नोटीसा

आझाद मैदानाशेजारील खाद्यपदार्थ स्टॉल्सधारकांना नोटीसा

Published on

आझाद मैदानाशेजारील खाद्यपदार्थ स्टॉल्सधारकांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : आझाद मैदानाशेजारी आंदोलकांसाठी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी तसेच सामान्य मुंबईकरांसाठी स्वस्त दरात खाद्यपदार्थांची सेवा देणाऱ्या स्टॉल्सवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. तब्बल ७० ते ८० वर्षांपासून अधिकृत परवानाधारक म्हणून चालणारे हे स्टॉल्स आता महापालिकेच्या नोटिसांमुळे बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

‘मराठमोळी मिसळ, नानाचा चहा, शर्मा पावभाजी, कॅननची पावभाजी आणि काला खट्टा सरबत अशा चवदार पदार्थांनी आंदोलकांना आणि सर्वसामान्यांना ऊर्जा देणारे हे स्टॉल्स अनेक पिढ्यांच्या कष्टांवर उभे राहिले; मात्र आता क्रीडा भवनाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली हे सर्व गाळेधारक उदरनिर्वाहाच्या संकटात आले आहेत. महापालिकेने हे स्टॉल्स हटविण्याची नोटीस दिली असली, तरी पर्यायी पुनर्वसनाची कुठलीही ठोस योजना समोर आणलेली नाही. स्टॉलधारकांकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘कायदेशीरपणे व्यवसाय करूनही आमच्यावर अन्याय केला जातोय,’ अशी स्टॉलधारकांची तीव्र प्रतिक्रिया आहे. २०१९ मध्ये तत्कालीन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी सर्व स्टॉल्स एकाच रंगसंगतीत करून या परिसराचे सौंदर्य वाढविण्याचा प्रस्ताव मांडला होता; मात्र आज त्याच स्टॉल्सना हटवून पोटावर पाय देण्याचे काम महापालिका करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात रस्ता रुंदीकरणावेळी या स्टॉलधारकांचे पुनर्वसन करण्यात आले होते; मात्र आता पुनर्वसनाची जबाबदारी स्वतःवर न घेता ती स्टॉलधारकांवर ढकलण्याचा महापालिकेचा प्रयत्न अन्यायकारक ठरत असल्याची भावना येथील स्टॉलधारकांनी व्यक्त केली. या प्रकरणावर ए विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी सांगितले की, ‘क्रीडा भवनाच्या बांधकामामुळे स्टॉल्सचे नुकसान होऊ नये म्हणून नोटीस दिली आहे. पात्र ठरलेल्यांवर अन्याय होणार नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com