परळ, दादरमधील वाहतुकीवर ताण

परळ, दादरमधील वाहतुकीवर ताण

Published on

परळ, दादरमधील वाहतुकीवर ताण
एल्फिन्स्टन पूल पाडकाम; वाहतुकीचे नियोजन चुकल्‍याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : एल्फिन्स्टन पूल बंद झाल्यापासून दादर-लोअर परळ परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. रहिवासी, शालेय विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी यांना दररोजच्या प्रवासात एक तास ते ९० मिनिटांच्या विलंब होत असून, वाहतूक नियोजन योग्यरितीने न केल्याचा आरोप रहिवासी आणि यंत्रणांकडून केला जात आहे.
प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रभादेवी पुलावरून धावणाऱ्या बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यातच येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असून, अनेक रुग्णांनाही त्याचा फटका बसत आहे. टिळक आणि करी रोड पुलांवरील वाहनांची संख्या नेहमीपेक्षा चौपट झाली आहे. या दोन्ही ठिकाणी वाहनांची गर्दी नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाल्याचे दिसते. उपनगरातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभादेवी पुलावरून केईएम, वाडिया, टाटा या रुग्णालयांत जाणे सोपे पडत होते. आता याच अंतरासाठी दादरच्या टिळक पूल किंवा करी रोड पुलाचा वापर करून अर्धा पाऊण तास खर्च करून वळसा मारावा लागत आहे.
प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असल्याने वाहतूक कोंडी होत असून, सायन ते परळ या मार्गावर वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत.

कुठे होते वाहतूक कोंडी?
दादरमधील सेनापती बापट मार्ग, गोखले रोड आणि भवानी शंकर रोड, लोअर परळमधील एन. एम. जोशी मार्ग, माहिममधील लेडी जमशेदजी रोड, वरळीमधील गणपतराव कदम मार्ग, टिळक पूल आणि महादेव पालव मार्ग (करी रोड पूल) यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना पूर्वी शाळेत पोहोचण्यासाठी अर्धा तास लागत असे, परंतु आता तोच प्रवास करण्यासाठी दीड तास लागत आहे. दादर येथील भाजीविक्रेत्यांच्या कामकाजाच्या वेळेत बदल केल्यास काही फरक पडला असता, परंतु असे कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.
- मुनाफ ठाकूर, रहिवासी

एल्फिन्स्टन पुलावरून परळ केईएम, वाडिया आणि टाटासारख्या प्रमुख रुग्णालयांत पोहोचण्यासाठी पाच मिनिटांचे अंतर होते. आता ३० मिनिटे ते ४५ मिनिटे लागत आहेत. या पुलाच्या नियोजनात स्थानिकांचे म्हणणे लक्षात घेतले नाही. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
- गीता वैद्य, रहिवासी
एल्फिन्स्टन पूल बंद असल्याने करी रोड पुलावरून जावे लागत आहे. त्यामध्ये अर्धा ते पाऊण तास लागतो. दादरच्या प्लाझा सिनेमा येथेही वाहतूक ठप्प होते. सर्वांना कामावर जायला उशीर होत आहे.
- हरीश वडेती, दुचाकीस्वार

एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी बंद झाल्यापासून शालेय मुलांच्या प्रवासाला मोठा फटका बसत आहे. सकाळी ४० मिनिटे, तर दुपारी आणि सायंकाळी एक तास जास्त लागत आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे.
- अनिल गर्ग,
अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन

एल्फिन्स्टन पूल बंद केल्याने वाहतूक पोलिसांच्या नियोजनानुसार टिळक पूल जवळ असल्याने त्यावरून एसटी वाहतूक सुरू ठेवली. सोमवारी आम्हाला वाहतूक महालक्ष्मीवरून वळवून चिंचपोकळी मार्गे यावे, अशी सूचना देण्यात आली. त्यामुळे आठ किमीचे अंतर वाढले होते. त्यामुळे मोठी गैरसोय होत होती. बुधवारी वाहतूक पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर सुधारित नियोजनानुसार चिंचपोकळी पुलावरून वाहतूक केली जाईल.
- नितीन चव्हाण,
आगारप्रमुख, परळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com