सात दिवसांत निर्णय मागे घ्या
सात दिवसांत निर्णय मागे घ्या
आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांचा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : महाराष्ट्रातील अॅलोपॅथी डॉक्टरांनी होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीविराेधात खासगी आणि शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनी गुरुवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. याचा काही प्रमाणात परिणाम रुग्णालयांच्या कामकाजावर झाला; मात्र भविष्यात आरोग्यसेवेत अडथळा निर्माण होऊ द्यायचा नसेल तर सरकारने सात दिवसांत हा निर्णय मागे घ्यावा, असे इंडियन मेडिकल असाेसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
जुलैच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोंदणीचा निर्णय ११ जुलैला मागे घेतला होता. एफडीएने हे नोटिफिकेशन मागे घेतले हाेते. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनेही नोटिफिकेशन शासनाच्या आदेशानंतर मागे घेतले; मात्र दोन महिन्यांनंतर सरकारने घूमजाव केले, यामागे राजकीय आणि होमियोपॅथी असोसिएशनचा दबाव आहे. होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालये रिकामी आहेत त्यांच्यासाठी हा खेळ सुरू आहे, असा आराेप कदम यांनी केला.
आमची मागणी एकच आहे, की होमिओपॅथी डॉक्टरांनी आपल्या कौन्सिलमध्येच राहावे. आयुर्वेदिक, डेंटल, होमिओपॅथी असे प्रत्येकासाठी स्वतंत्र कौन्सिल आहे. ॲलोपॅथी कौन्सिलमध्ये अन्य पद्धती मिसळल्यास (मिक्सोपॅथी) रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.
ॲलोपॅथी अभ्यासक्रम ५.५ वर्षांचा असून, त्यात २० विषयांचा सखोल अभ्यास केला जातो. त्यामुळे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी (सीसीएमपी) हा एका वर्षाचा कोर्स केलेल्या होमिओपॅथीचे डॉक्टर ॲलोपॅथीचे उपचार करू लागल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल. चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा असा सवाल डॉ. कदम यांनी केला.
संपामुळे रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. मुंबईसह राज्यभरातील २३१ शाखांनी संपाला पाठिंबा दिला. अनेक खासगी रुग्णालये बंद राहिली, तर शासकीय रुग्णालयांत काळ्या फिती लावून डॉक्टरांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. नियमित कामकाजाचे ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे आयएमएचे डॉ. कदम यांनी सांगितले.
मागणी मान्य न झाल्यास काय?
मुख्यमंत्र्यांनी दुपारी तातडीची बैठक बोलावली असून, यात पुढील भूमिका ठरण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी सात दिवसांची डेडलाईन दिली आहे. जर शासनाने नोटिफिकेशन मागे घेतले नाही, तर आम्ही मुंबईत लाँग मार्च काढून आझाद मैदानावर उपोषणाला बसू. गरज पडल्यास कठोर आंदोलन करू, असे डाॅ. संताेष कदम यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.