राज्यात ‘एक मंडळ एक पोलिस अंमलदार’

राज्यात ‘एक मंडळ एक पोलिस अंमलदार’

Published on

राज्यात ‘एक मंडळ एक पोलिस अंमलदार’

सर्व सण-उत्सवांत समन्वयासाठी पोलिस महासंचालकांची योजना

मुंबई, ता. १८ : गणेशोत्सव, नवरात्र, ईद, मोहरमसह राज्यात साजऱ्या होणाऱ्या सर्व धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सण-उत्सवांत आयोजक मंडळे आणि पोलिसांमधील समन्वय वाढवा, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून विनाअडथळा व शिस्तीत उत्सव पार पडावेत, या उद्देशाने राज्याच्या महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ‘एक मंडळ एक पोलिस अंमलदार’ ही योजना आखली आहे.

शुक्ला यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता. १२) राज्यातील सर्व आयुक्तालये, अधीक्षक कार्यालयांना स्थायी आदेशाद्वारे अखत्यारीतील प्रत्येक पोलिस ठाण्यात ही योजना सुरू करण्याची सूचना केली आहे. पोलिस ठाण्यांतर्गत विविध सण-उत्सव आयोजित करणाऱ्या सर्व मंडळांची, संस्थांची यादी तयार करून उपलब्ध मनुष्यबळानुसार प्रत्येक अंमलदारावर एक ते चार मंडळांची जबाबदारी सोपवली जाईल. अंमलदार संबंधित मंडळ, संस्था पदाधिकाऱ्यांशी ओळख करून घेतील, आयोजनाची माहिती घेतील. व्हॉट्सॲप समूह तयार करतील. उत्सव संपेपर्यंत येणाऱ्या अडीअडचणी सोडवतील.

मंडळांना विविध परवानग्यांसाठी पोलिस ठाणे, उपआयुक्त कार्यालयात चकरा माराव्या लागतात. दुसरीकडे मंडळांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे भेटीस येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वेळेचा अपव्यय होतो. महासंचालक शुक्ला यांच्या योजनेनुसार मंडळाशी संलग्न अंमलदार नियमानुसार अर्ज करून आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळवून देतील. एखाद्या परवानगीत अडचण निर्माण झाल्यास ते ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनात आणून देतील. या योजनेचा लाभ पुढील आठवड्यात होऊ घातलेल्या नवरात्रोत्सव आणि दसऱ्यापर्यंत दांडिया, गरबा आयोजन करणाऱ्यांना मिळू शकेल.

योजनेचा उद्देश काय?
मंडळ आणि पोलिसांत सातत्यपूर्ण थेट संपर्क ठेवून सण-उत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणींचे निरसन करून वाद किंवा गैरसमज टाळून कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे. नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी घेत उत्सव शिस्तबद्ध पद्धतीत, शांततेत पार पाडणे.
---
अंमलदाराची जबाबदारी
आगमन मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक विधी, विसर्जन मिरवणुकांची वेळ, मार्ग, सहभागी संख्या आदी माहिती घेऊन वरिष्ठांना कळविणे, कुठल्याही परिस्थितीत मिरवणुकीचा नियोजित मार्ग बदलणार नाही, याची काळजी घेणे. मंडळांना ध्वनी प्रदूषणबाबत जागृती करणे, आक्षेपार्ह देखावे, गाणी वाजणार नाहीत, याची दक्षता घेणे, वाहतूक पोलिसांसोबत बीट अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधणे, मंडळाशी सतत संपर्क ठेवून तातडीच्या प्रसंगी त्वरित प्रतिसाद देणे, मिरवणूक सुरू झाल्यापासून ती संपवून भाविक आपापल्या भागात परतेपर्यंत त्यांच्यासोबत राहणे.
----
अंमलदारांचा अभिप्राय महत्त्वाचा
सण-उत्सव साजरा झाल्यानंतर संलग्न अंमलदाराने आपला अभिप्राय वरिष्ठ अधिकाऱ्यास सादर करावा. त्यात अंमलबजावणीतील यश, आलेल्या अडचणी व भविष्यातील सुधारणा यांचा समावेश असावा, असे महासंचालकांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com