मनोरुग्ण महिलेच्या मदतीला धावली खाकी
मनोरुग्ण महिलेच्या मदतीला धावली ‘खाकी’
पोलिस हवालदाराचे सर्व स्तरांतून कौतुक
जयेश शिरसाट : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : वेडसर वा मनाेरुग्ण व्यक्ती दिसल्यास पांढरपेशी मानसिकतेतून अनेक जण मान फिरवतात; पण पाेलिस हवालदार सुशील शिखरे (वय ४१) अपवाद ठरले आहेत. बॅँडस्टॅँडवर अर्धनग्नावस्थेत भटकणाऱ्या मनाेरुग्ण महिलेला पाहून संवेदनशील मनाचे शिखरे तिच्या मदतीला धावून जात तिची लाज राखली. या वेळी त्यांनी उपस्थितांकडे मदतीची विनंती केली; पण कुणीच पुढे आले नाही. तिच्याकडून हल्ला हाेण्याची शक्यता असूनही ते मागे हटले नाहीत. या कृतीतून त्याने इतरांसमाेर आदर्श निर्माण केला आहे.
काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेची चित्रफीत दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर प्रसारित हाेत आहे. ही घटना घडली तेव्हा बँडस्टँडवर असंख्य तरुणी, महिला उपस्थित होत्या; मात्र त्यांनी या महिलेला पाहून मान फिरवली. तिच्या मदतीसाठी शिखरे यांनी मदतीसाठी आवाहन करूनही कुणीही पुढे आले नाही. पायी जाणाऱ्या एका महिलेने आपली ओढणी काढून शिखरे यांना दिली. त्यांनी त्या ओढणीने या महिलेचे अर्धनग्न शरीर झाकले.
शिखरे जवळ जाताच तिने हाती मिळेल ते फेकून मारण्याचा प्रयत्न करत पुढे पळू लागली. त्याही अवस्थेत शिखरे यांनी पर्वा न करता ओढणी बांधून या महिलेची लाज झाकली. या महिलेने अंगाला घाण लावल्याचे लक्षात येताच त्यांनी निर्भया पथकाला तेथे बोलावून घेतले. पथकातील महिला अंमलदारांनी त्या महिलेला आंघोळ घालून तिला स्वच्छ कपडे दिले. या कृतीमुळे शिखरे आणि पाेलिस दलाचे सेलिब्रिटींसह सर्वच जण काैतुक करीत आहेत.
२६/११ हल्ल्यात विशेष कार्य बजावलेले, क्यूआरटी, फोर्स वनचे कमांडो प्रशिक्षण पूर्ण केलेले शिखरे सध्या खार पोलिस ठाण्यात नियुक्त आहेत. सध्या अभिनेता सलमान खान आणि त्याच्या निवासस्थानी असलेल्या बंदोबस्तात त्यांचा सहभाग आहे. सडेतोड स्वभाव, प्रामाणिकपणा, पीळदार शरीरयष्टी आणि हातांवर पोलिस दलाचे बोधचिन्ह व सत्यमेव जयते हा संदेश कोरून घेतल्याने शिखरे यांची पोलिस दलात सिंघम म्हणून ओळख आहे.
----
कोट
ते दृश्य मला पाहावले नाही. ती महिला मनोरुग्ण असली तरी कोणाची आई असेल, बहीण असेल. नातेवाइकांनी तिला वाऱ्यावर सोडले असेलही; पण पोलिस दल तिच्याकडे आई, बहिणीप्रमाणे पाहते. तिची लाज झाकणे माझे कर्तव्य हाेते. त्यासाठी तेव्हा जे योग्य वाटले ते केले.
- सुशील कमल अरुण शिखरे,
पोलिस हवालदार, मुंबई पोलिस
----
कर्कराेगग्रस्त बालकांसाठी मुंडण
गेल्या आठवड्यात नायगाव येथील आपल्या निवासस्थानी जात असताना एक महिला कडेवरील तीन ते चार वर्षांच्या बालकाला घेऊन असहाय्य अवस्थेत शिखरे यांना दिसली. केमोथेरेपीसाठी मुलाचे केस कापायचे होते; पण मुलगा काही ऐकत नव्हता. शिखरे या मुलाला स्वतः केशकर्तनालयात घेऊन गेले. त्या मुलाला शांत करण्यासाठी, त्याचे मन वळवण्यासाठी त्यांनी स्वतःही मुंडण केले. त्या मुलाचे केस कापून होताच शिखरे यांनी त्याच्या आईला पाच हजार रुपये मदत दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.