बुलेट ट्रेनचे तिकिट सामान्यांच्या आवाक्यात

बुलेट ट्रेनचे तिकिट सामान्यांच्या आवाक्यात

Published on

बुलेट ट्रेनचे तिकीट सामान्यांच्या आवाक्यात
प्रकल्पातील शिळफाटा बोगदा पूर्ण; रेल्वेमंत्र्यांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात शिळफाटा ते घणसोलीदरम्यान पाच किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. घणसोली येथे शनिवारी (ता. २०) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या बोगद्याचा ब्रेकथ्रू कार्यक्रम पार पडला. या टप्प्यामुळे प्रकल्पाला मोठी गती मिळाली असून, देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे तिकीट दर मध्यमवर्गीय प्रवाशांच्या आवाक्यात असेल, अशी ग्वाही या वेळी रेल्वेमंत्र्यांनी दिली.


रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, ‘‘मुंबई-अहमदाबाद प्रवास नऊ तासांचा असताना बुलेट ट्रेनमुळे दोन तास सात मिनिटांवर येणार आहे. प्रकल्पाचे सुरत ते बिलिमोरा पहिल्या टप्‍प्यातील काम २०२७मध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर ठाण्यापर्यंतचा टप्पा २०२८ आणि मुंबईतील बीकेसीपर्यंतचा शेवटचा टप्पा २०२९मध्ये पूर्ण होईल. सुरुवातीला सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बुलेट ट्रेन दर अर्ध्या तासाने धावेल. तिकीटदरही मध्यमवर्गीय प्रवाशांच्या आवाक्यात असतील. संपूर्ण नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी सेवा उपलब्ध होईल. यामुळे प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची गरज कमी होईल.’’

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात शिळफाटा ते बीकेसीदरम्यान एकूण २१ किलोमीटर लांबीचा समुद्राखालील बोगदा आहे. त्यापैकी सात किलोमीटर ठाणे खाडीखाली जाणारा मार्ग आहे. मे २०२४मध्ये एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनलिंग पद्धत) खोदकाम तीन ठिकाणांवरून सुरू केले गेले. ९ जुलै २०२५ रोजी सावली शाफ्ट आणि एडीआयटीदरम्यान पहिला ब्रेकथ्रू पूर्ण झाला. शिळफाटा बोगद्याचा हा ब्रेकथ्रू सावली शाफ्टपासून शिळफाटा पोर्टलपर्यंतच्या ४.८८१ किमी लांबीच्या बोगद्याचा भाग पूर्ण झाल्याचे दर्शवतो. या टप्प्यामुळे शिळफाटा येथील वायाडक्टशी बोगदा जोडला जाणार आहे. बोगद्याची आतली रुंदी १२.६ मीटर आहे. उर्वरित १६ किलोमीटर बोगदा ‘टनल बोरिंग मशीन’ (टीबीएम) वापरून खोदला जाणार असून, त्याचा व्यास १३.१ मीटर असेल. हा बोगदा एकल ट्युब प्रकाराचा असून, त्यात अप आणि डाउन ट्रॅकसाठी दुहेरी मार्ग असतील. दोन्ही ट्रॅकसाठी ट्विन ट्रॅकची व्यवस्था करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती
- ५०८ किलोमीटरच्या प्रकल्पातील ३२१ किलोमीटर वायाडक्टचे काम पूर्ण
- १७ नदीवरचे पूल आणि नऊ स्टील ब्रिज पूर्ण
- चार लाखांहून अधिक नॉइस बॅरियर्स बसवले
- २०६ किलोमीटर ट्रॅक बेडचे काम पूर्ण
- २,००० हून अधिक ओएचई बसवले
- पालघर जिल्ह्यातील सात डोंगरी बोगद्यांवर खोदकाम सुरू
- गुजरातमधील सर्व स्थानकांवर अधिरचनेचे काम अंतिम टप्प्यात
- मुंबई भूमिगत स्थानकावर बेस स्लॅब कास्टिंग प्रगतिपथावर


शिळफाटा टनेलचा ब्रेकथ्रू हा भारतीय रेल्वे इतिहासातील ऐतिहासिक क्षण आहे. हा प्रकल्प मध्यमवर्गीय प्रवाशांच्या आकांक्षाही पूर्ण करेल.
- अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com