पाण्याची वाढत्‍या मागणीचे नियोजन

पाण्याची वाढत्‍या मागणीचे नियोजन

Published on

पाण्याच्या वाढत्‍या मागणीचे नियोजन
२०४१ पर्यंत ६,५३५ दशलक्ष लिटरवर पोहोचणार; नवे जलस्रोत विकसित करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईला दररोज तब्बल ४,००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा सात जलस्रोतांमधून केला जातो. तरीही लोकसंख्या वाढ, विकासाची गती आणि हवामान बदलामुळे आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढणार आहे. ही मागणी २०४१ पर्यंत ६,५३५ दशलक्ष लिटरवर पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर नवे जलस्रोत विकसित करण्याची महत्त्वाची पावले महापालिकेतर्फे उचलली जात आहेत.

पाण्याची तूट कमी करण्यासाठी नवे प्रकल्प
महापालिकेच्या अंदाजानुसार २०४१ पर्यंत मुंबईची लोकसंख्या एक कोटी ७२ लाखांवर पोहोचेल आणि पाण्याची मागणी दररोज ६,५३५ दशलक्ष लिटर इतकी होईल. ही वाढती गरज भागवण्यासाठी शासनाने दिलेले तीन महत्त्वाचे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. यात गारगाई प्रकल्प : ४४० दशलक्ष लिटर प्रतिदिन, पिंजाळ प्रकल्प : ८६५ दशलक्ष लिटर प्रतिदिन आणि दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्प : १,५८६ दशलक्ष लिटर प्रतिदिन यांचा समावेश आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दररोज तब्बल २,८९१ दशलक्ष लिटरची वाढ होणार आहे.

निःक्षारीकरण प्रकल्पालाही गती
भविष्यात हवामान बदल आणि पर्जन्यमानातील अनिश्चितता लक्षात घेऊन मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प राबविण्याची तयारी सुरू आहे. या प्रकल्पाची क्षमता सुरुवातीला २०० दशलक्ष लिटर प्रतिदिन असून ती पुढे ४०० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतकी वाढवण्याची योजना आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल व निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास समुद्राच्या खारट पाण्याचे रूपांतर पेयजलामध्ये करून मुंबईच्या पाणीपुरवठ्याला नवा आधार मिळेल.

सध्याचा पाणीपुरवठा असा...
मुंबईला सध्या विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि भातसा या सात जलस्रोतांमधून पाणी मिळते. हे पाणी भांडुप संकुल, पांजरापूर, विहार आणि तुळशी जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये शुद्ध केले जाते. त्यानंतर पाणी भांडुप संकुल आणि येवई महासंतुलन जलाशयात साठवले जाऊन शहरातील २७ सेवा जलाशयांना पुरविले जाते. येथून पुढे पाणी विविध भागांमध्ये पोहोचवण्यासाठी ५,००० किमी लांबीच्या वितरण जाळ्यातून दररोज वाहते.

१० हजार कर्मचारी झटतात रात्रंदिवस
मुंबईकरांच्या नळातून स्वच्छ पाणी येण्यासाठी दररोज १,१५० अभियंते, ८,९५० कामगार आणि इतर कर्मचारी वर्ग मिळून जवळपास १० हजार कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेतात. गळती शोधणे आणि दुरुस्ती करणे, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, विकसनशील भागांमध्ये नवी जलवाहिनी टाकणे, दररोज सुमारे १,००० झडपांची उघडझाप करणे, या कामांमुळे मुंबईचा २४ तास अखंडित पाणीपुरवठा सुरळीत ठेवला जातो. जागतिक मानकांनुसार पाणी शुद्ध केले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com