मृत्यूचा कारखाना सुरूच
मृत्यूचा कारखाना सुरूच
न्यायालयाच्या आदेशाला हरताळ; गोवंडीकरांचा संताप
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ‘मृत्यू देणारी फॅक्टरी बंद करा’ असा आदेश न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. एसएमएस एनवोक्लीन प्रायव्हेट लिमिटेड या बायो-मेडिकल कचरा जाळणाऱ्या कंपनीला बंद करण्याचे स्पष्ट निर्देश असूनही आजही हा कारखाना सुरू आहे. परिणामी गोवंडी व आसपासच्या नागरिकांना प्रदूषण, आजार व मृत्यूच्या छायेखाली जगावे लागत आहे.
गोवंडी येथील बैंगनवाडी डम्पिंग रोड परिसरामध्ये राहणारे साबीर खान (वय ४९) हे गेल्या सहा वर्षांपासून दम्याच्या आजाराने त्रस्त आहेत. आधीच वय त्यात कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे त्यांच्या आजारात अधिक भर पडली आहे. आजारावर हजारो रुपये खर्च केले, पण दिलासा काही मिळत नाही, अशी व्यथा येथील अनेक रहिवाशांची आहे. येथील नागरिकांना फुप्फुसाचा संसर्ग, क्षयरोग, त्वचा रोगाने त्रस्त आहेत. त्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गोवंडीतील प्रदूषणाची दखल घेऊन ११ सप्टेंबर २०२३ रोजी संबंधित कारखान्याविरोधात दाखल जनहित याचिकेवर महत्त्वाचा निर्णय दिला. दोन वर्षांच्या आत नवा प्रकल्प सुरू करावा अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, असे आदेश या वेळी देण्यात आले. दरम्यान, जुन्या प्लांटची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दर महिन्याला तपासणी करावी, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती, पण दोन वर्षे उलटूनही परिस्थिती बदललेली नाही.
..
धुरात गुदमरतोय श्वास
गोवंडी व शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी सांगितले की, ‘हवेत असह्य धूर व दुर्गंधी कायम आहे. लहान मुलांना दमा, वयोवृद्धांना हृदयरोग आणि श्वसनाच्या आजारांचा त्रास वाढला आहे. ‘आमचे आयुष्य या कारखान्यामुळे नरकयातना बनले आहे. न्यायालयाने बंदी घातली तरी सरकार व राजकीय नेते कंपनीला वाचवत आहेत,’ असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला.
गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक फैय्याज शेख यांनी सांगितले की, प्रदूषणामुळे स्थानिकांनी अनेक आजारांचा सामना केला. आजही जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे, पण प्रशासन याकडे लक्ष घालायला तयार नाही, पण आता आंदोलन तीव्र होणार आहे. पुढील वेळेस आम्ही रस्तेही रोखू, कारण हा जीवघेणा कारखाना आम्हाला मान्य नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका यांच्याकडून नियमित तपासणीचे दावे केले जातात; मात्र प्रत्यक्ष स्थिती बदललेली नाही. दोन वर्षांपूर्वी न्यायालयीन आदेश देऊनही अंमलबजावणी न होणे हे प्रशासनाच्या उदासीनतेचे निदर्शक मानले जात आहे.
न्यायालयाचा आदेश दोन वर्षांपूर्वीच आला होता, तरीही येथील प्रदूषणकारी कारखाना सुरूच आहे. हा थेट जनतेच्या जीवाशी खेळ आहे. आता आम्ही शांत बसणार नाही, रस्त्यावर उतरून हक्कासाठी निर्णायक लढा देणार आहोत.
- फैय्याज शेख, संस्थापक, गोवंडी न्यू संगम वेल्फेअर सोसायटी
..
मी औषधविक्रेता आहे. माझ्याकडे होणाऱ्या गोळ्यांच्या खरेदीवरून या परिसरात अनेकांना दमा, क्षयरोग, त्वचारोग बळावल्याचे दिसते. येथील प्रदूषणामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
- अब्दुल रहीम खान, औषधविक्रेता
सहा वर्षांपासून दम्याने त्रस्त आहे. औषधांवर हजारो रुपये खर्च केले, पण प्रदूषणामुळे तब्येत अजूनच खालावत चालली आहे. श्वास घेणेही कठीण झाले आहे.
- साबीर खान, रुग्ण
गोवंडी येथील प्रकल्प रसायनी येथील जांभीवली येथे स्थलांतरित केला जात आहे. त्यासाठी आवश्यक मंजुरी देण्यात आली आहे. दैनंदिन काम सुरू ठेवून प्रकल्प स्थलांतरित करण्यात येत असल्याने वेळ लागत आहे. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प स्थलांतरित करण्याचे काम पूर्ण होईल.
- किरण दिघावकर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.