पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर

Published on

पुरस्कारप्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर
किंवा
हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई, ता. २२ : ‘विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल, अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कारप्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत,’ असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. २२) काढले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘एनसीपीए’च्या टाटा थिएटरमध्ये झालेल्या या समारंभात राज्यातील १११ गुणवंत शिक्षकांचा या वेळी सत्कार करण्यात आला. या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार ज. मो. अभ्यंकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांच्यासह पुरस्कारप्राप्त शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्कार वितरणाच्या वेळी दिलेल्या व्हिडिओ संदेशात म्हटले की, ‘शिक्षक केवळ पुस्तकातील धडा शिकवत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात. आत्मविश्वास, संस्कार आणि प्रामाणिकपणाची बीजे त्यांच्या मनात पेरतात. शिक्षकांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे.’ तर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, ‘बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. पूर्वी साक्षर-अनाक्षर यावर भर होता, नंतर संगणक साक्षरतेचा काळ आला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) युग आहे. यामुळे प्रत्येकाने एआय साक्षर होणे, डिजिटल शिक्षण पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे. पुरस्कारामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढली असून, शिक्षकांनी स्वत:ला अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.’ राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविलेल्या शिक्षकांचे कौतुक करून अधिका‍धिक संख्येने शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळवावा, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद शाळा आता कात टाकत असल्याबद्दल त्यांनी या वेळी समाधान व्यक्त केले.

शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, ‘शिक्षकांचा प्रवास हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीच नाही तर समाजाच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्‍ज्ञांची भूमी असून, त्यांच्या कार्यातून समाजात परिवर्तन घडले. आजचे शिक्षक या परंपरेचे वारस आहेत. महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे.’ तर शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोठ्या उत्साहात नव्या योजनांची अंमलबजावणी सुरू असून, राज्य शासनाकडून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याचे सांगितले.


--
शिक्षकांच्या कार्यगाथा अभिमानास्पद : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षकांच्या कार्यगाथा महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कोविडसारख्या कठीण काळात जग थांबले, पण शिक्षकांनी शिक्षण थांबू दिले नाही. ज्ञानदानाची अखंड धारा सुरू ठेवत त्यांनी समाजाला प्रेरणा दिली, अशा शब्दात त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.


आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास पाच कोटी : दादा भुसे
पुढील वर्षांपासून कला आणि क्रीडा क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांनाही सन्मानित केले जाणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना अनुक्रमे पाच कोटी, तीन कोटी आणि दोन कोटी रुपयांची पारितोषिके दिली जातील, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या वेळी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com