उरण वायू वीज केंद्राची धुरा सांभाळणारी नवदुर्गा!
उरण वायू वीज केंद्राची धुरा सांभाळणारी नवदुर्गा!
प्रशिक्षणार्थी ते मुख्य अभियंता खडतर प्रवास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : वीज क्षेत्रात काम करायचे म्हटले की दिवसाचे २४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत राहण्याची तयारी ठेवावी लागते. त्यात महिला म्हटले की घरची जबाबदारी सांभाळत कार्यालयाची जबाबदारी निभावणे तसे कठीणच, पण सध्या महानिर्मितीच्या उरण वायू वीज केंद्राच्या मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या विजया बोरकर या ही जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या पहिल्या नवदुर्गा ठरल्या आहेत. १ जुलैपासून त्या या पदावर कार्यरत आहेत.
अमरावती विद्यापीठातून बी. ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९३ मध्ये विजया बोरकर या महानिर्मितीच्या (तत्कालीन वीज मंडळ) कोराडी औष्णिक वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या होत्या. सुरुवातीपासूनच अंगी चिकाटी आणि जबाबदारी घेऊन काम करण्याची सवय असल्याने त्यांनी महानिर्मीतीमध्ये सहअभियंता, उपकार्यकारी अभियंता, अभियंता, मुख्य अभियंता अशा वेगवेगळ्या पदांवर काम करत नुकत्याच उरण वायू वीज केंद्राच्या मुख्य अभियंता म्हणून रुजू झाल्या आहेत.
या वाटचालीत त्यांनी अनेक चढउतार मागे टाकतानाच आलेल्या अनुभवाच्या जोरावर घरची जबाबदारी सांभाळतानाच अधिकारी म्हणून ही कामाची छाप पाडली आहे. सध्या त्या मुख्य अभियंता म्हणून उरण वीज केंद्राचे संचलन, देखभाल अशा सर्व विभागाची पार पाडत आहेत.
महिलांनी आत्मविश्वासाने पुढे जावे
एखाद्या मोठ्या पदावर काम करताना आपण महिला आहोत हे न्यूनगंड महिलांनी मनातून काढून टाकत आत्मविश्वासाने काम करावे. आजूबाजूला पुरुष मंडळी काम करत असली तरी तुमचा आत्मविश्वास आणि काम करण्याची पद्धत बघून ते आपसूकच महिला-पुरुष असा भेद विसरून जातात. त्यामुळे काम करताना महिलांसाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असल्याचे विजया बोरकर यांनी स्पष्ट केले.
काम करा, नवे शिका
बोरकर यांनी महानिर्मितीमध्ये कार्यरत असूनही नवीन काही शिकण्याचा ध्यास कायम ठेवला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एम. टेक. (एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम) हे शिक्षण पूर्ण केले आहे. तुम्ही काम करा आणि नवे शिकत राहा, यश नक्कीच मागे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.