सीमकार्डला बनवताहेत भामटे हत्‍यार!

सीमकार्डला बनवताहेत भामटे हत्‍यार!

Published on

सिम कार्डला भामटे बनवताहेत हत्‍यार!
सिम स्वॅपिंगच्या तक्रारी वाढल्या; मोबाईलचा ताबा घेत फसवणूक
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः फसवे शेअर ट्रेडिंग ॲप, आभासी अटक, टास्क भरायला देत फसवणुकीसह गेल्या काही महिन्यांत सिम स्वॅपिंग अर्थात वापरकर्त्याच्या सिम कार्डचा परस्पर ताबा मिळवून आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींचा ओघ वाढल्याचा दावा सायबर पोलिस करीत आहेत.
पूर्वी एखादी कंपनी, बडा उद्योजक किंवा व्यावसायिकासोबत अशा प्रकारचा गुन्हा घडून कोट्यवधी रुपये परस्पर चोरले जात. अलीकडे ई-सिमद्वारे सायबर भामटे सर्वसामान्यांना फसवू लागले आहेत. अलीकडच्या काळात सायबर पोलिसांकडे तपासासाठी आलेल्या प्रकरणांनुसार गृहिणींना लक्ष्य करण्याचा कल पुढे आला असून, ई-सिम जोडण्याच्या निमित्ताने त्यांच्या खात्यातील लाखो रुपयांवर परस्पर डल्ला मारण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक अशा गुन्हे प्रकारास सहज बळी पडू शकतात, असा अंदाज सायबर तज्‍ज्ञ आणि पोलिस व्यक्त करतात.
सायबर गुन्ह्यांच्या तपासाचा दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बँक व्यवहार कसे करावेत याबाबत बँकेत खाते असलेला प्रत्येक जण साक्षर असतोच असे नाही. ई-बँकिंगची गतही तशीच. त्यात नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी ई-सिम कार्ड उपक्रम सुरू केला. ई-सिम कार्ड म्हणजे काय, त्याचा फायदा काय, जोडणीसाठीची प्रक्रिया याबाबतची माहिती अद्याप सर्वांपर्यंत पोहोचलेली नाही. नेमका याच निरक्षरतेचा फायदा घेत भामट्यांनी फसवणुकीचे जाळे आता सर्वसामान्य नागरिकांवरही टाकण्यास सुरुवात केली आहे.

पूर्वीचा गुन्हे प्रकार
ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकाचे बँकिंग तपशील, बँक खाते जोडलेला मोबाईल क्रमांक मिळवायचा. त्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करायची आणि मोबाईल गहाळ झाल्याचे निमित्त करून नव्या सिम कार्डसाठी मोबाईल गॅलरी गाठायची. कंपनी त्याच क्रमांकाचे नवे सिम कार्ड देताना जुने बंद करते. नव्या सिम कार्डचा वापर करून भामटे संबंधित व्यावसायिकाचे ऑनलाइन बँकिंग स्वतःच्या ताब्यात घेऊन कोट्यवधी रुपये अवघ्या काही तासांत काढून घेतात. पूर्वी असा प्रत्येक गुन्हा शनिवार, रविवार पाहून केला जाई. सिम कार्ड बंद झाल्याने मूळ वापरकर्त्याला त्याच्या खात्यात परस्पर सुरू असलेल्या व्यवहारांची माहिती देणारे मेसेज मिळत नाहीत. तो सोमवारी गॅलरीत जाऊन तक्रार करेपर्यंत त्याच्या खात्यातून कोट्यवधी रुपये गायब होत होते.

ई-मेलमुळे वाचले साडेचार कोटी
कांदिवलीतील एका व्यावसायिकासोबत असा प्रकार घडला. त्याच्या खात्यातून तब्बल साडेचार कोटी भामट्यांनी काढले. सिम कार्ड बंद असल्याने त्याला मेसेज येत नसले तरी ई-मेल मात्र मिळत होते. धडाधड आलेले ते ई-मेल पाहून व्यावसायिकाने तत्काळ १९३० हेल्पलाईनवर तक्रार दिली. त्यामुळे सायबर पोलिस संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्याच्या मदतीने पुढील व्यवहार गोठवू शकले.

ई-सिमद्वारे अशी होते फसवणूक
- भामटे मोबाईल कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून संपर्क साधतात आणि ई-केवायसी न केल्याने सिम कार्ड बंद, ब्लॉक केले जाईल, असे सांगतात. अनेकदा अशा प्रकारचा फसवा ई-मेल किंवा मेसेजही ग्राहकांना प्राप्त होतो. तसेच ई-सिम कार्ड सुरू करण्याबाबत ग्राहकांना गळ घातली जाते.
- सिम कार्ड बंद होईल, या भीतीने बहुतांश ग्राहक समोरून ज्या सूचना येतील त्याचे तंतोतंत पालन करतात. भामटे ग्राहकांकरवी एअरटेल, जिओ, व्होडाफोन अशा सेवा पुरवठादार कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्राला काही मेसेज पाठवण्यास सांगतात. प्रत्यक्षात ते मेसेज ई-सिम कार्ड सुरू करण्याची विनंती असते. मात्र त्यात ग्राहकाऐवजी भामट्याचा ई-मेल आयडी असतो.
- ई-सिम कार्ड सुरू करण्यासाठी कंपनीने ई-मेल शेअर पाठवलेला कोड भामट्यांना प्राप्त होतो. त्याआधारे भामटे संबंधित ग्राहकाचे ई-सिम कार्ड स्वतःकडे सुरू करून घेतात. तर मूळ ग्राहकाचे सिम कार्ड बंद होते. भामटे ई-सिम कार्डद्वारे ऑनलाइन बँकिंगचे सर्व तपशील बदलून संबंधित ग्राहकाच्या खात्यावरील रक्कम काढून घेतात. दक्षिण मुंबईत अलीकडेच अशा प्रकारे दोन गृहिणींच्या खात्यातून एकूण २७ लाख रुपये भामट्यांनी चोरले आहेत.

अशी टाळा फसवणूक...
ई-सिम कार्ड जोडणीसाठी थेट संबंधित मोबाईल सेवा पुरवठादार कंपनीच्या गॅलरीत जावे. तिथे ही प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क करण्यासाठीच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधावा. विनाकारण दोन दिवस मोबाईल बंद असल्यास तातडीने गॅलरी, ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा. बँक व्यवहारांची माहिती मेसेजसोबत ई-मेलद्वारे घ्यावी. कंपनीचे अधिकारी म्हणून फोनवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याच्या सूचना पाळू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com