बसस्थानकांचे ‘बस पोर्ट’मध्ये रूपांतर करावे

बसस्थानकांचे ‘बस पोर्ट’मध्ये रूपांतर करावे

Published on

बसस्थानकांचे ‘बस पोर्ट’मध्ये रूपांतर करावे
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे ‘नॅरेडको’ला आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ ः एसटी महामंडळाकडे राज्यभरात सध्या ८५० ठिकाणी एकूण १३ हजार एकरइतकी ‘लँड बँक’ उपलब्ध आहे. नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलने (नॅरेडको) आपल्या अनुभव व कौशल्याच्या आधारे एसटीच्या विविध जागांचा विकास करून सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा वाटा उचलावा, असे आवाहन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ते नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात शुक्रवारी (ता. २६) बोलत होते.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, उपाध्यक्ष राजन बांदेलकर, महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष प्रशांत शर्मा, अभिनेते राहुल बोस यांच्यासह राज्यभरातील अनेक बांधकाम व्यावसायिक, घरबांधणी क्षेत्रांमध्ये पतपुरवठा करणाऱ्या विविध बँकांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले, की नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ही बांधकाम क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरची शिखर संस्था आहे. ही संस्था देशातील बांधकाम उद्योग व सर्वसामान्य जनता यांना जोडण्याचे काम करते. नुकताच राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार एसटी महामंडळाच्या जागा सार्वजनिक - खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यासाठी ९८ वर्षांचा भाडेकरार करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यभरात विविध शहरांमध्ये अगदी मोक्याच्या ठिकाणी एसटीच्या जागा आहेत. त्या विकसित करताना एसटीला आवश्यक असणाऱ्या आगार, बसस्थानके व इतर आनुषंगिक आस्थापना बांधून हस्तांतरित करण्याच्या अटीवर उर्वरित जागा संबंधित विकसकाला व्यावसायिक तत्त्वावर विकसित करून ती वापरण्यासाठी ९८ वर्षांच्या भाडेकराराने देण्यात येणार आहे. नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलसारख्या संस्थेने या संधीचा फायदा घेऊन आपल्या अनुभव व कौशल्याच्या जोरावर राज्यभरातील बसस्थानकांचे रूपांतर बस पोर्टमध्ये करावे व सर्वसामान्य जनतेला एक दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यामध्ये हातभार लावावा, असे आवाहन या वेळी मंत्री सरनाईक यांनी केले.

गुजरातच्या धर्तीवर उभारणी
तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे बस पोर्ट विकसित केली आहेत, तशीच बस पोर्ट महाराष्ट्रातदेखील या संस्थेच्या माध्यमातून विविध विकसकांनी पुढे येऊन विकसित करावेत. अर्थात, महाराष्ट्रातील करोडो सर्वसामान्य जनतेला प्रवासी दळणवळणाची सेवा देणाऱ्या एसटीच्या प्रगतीमध्ये राज्यातील विकसकांचे हे योगदान आम्ही कदापि विसरणार नाही, असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com