मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला डिजिटल आयाम

मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला डिजिटल आयाम

Published on

मुंबईच्या ऐतिहासिक वारशाला डिजिटल आयाम
‘सीएसएमव्हीएस’ राबविणार डिजिटल लायब्ररी प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना डिजिटल स्वरूपात जिवंत ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने (सीएसएमव्हीएस) घेतला आहे. यासाठी वस्तुसंग्रहालयाकडून मुंबईच्या ऐतिहासिक इमारतींचा डिजिटल लायब्ररी हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील ऐतिहासिक वास्तू, जुन्या इमारती, मैदाने, चित्रपटगृहे, प्रेक्षणीय स्थळे झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे धोक्यात आली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचा स्तुत्य उपक्रम सीएसएमव्हीएस वस्तुसंग्रहालयाने हाती घेतला आहे. ‘द सिटी ॲज आर्काइव्ह’ या प्रकल्पाद्वारे मुंबईतील या ऐतिहासिक वास्तूंचा इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येणार आहे.

डिजिटल लायब्ररी प्रकल्पांतर्गत ‘१०० बिल्डिंग्ज दॅट मेक मुंबई’ या पायलट उपक्रमापासून सुरू होणार असून, या डिजिटल संग्रहालयात हजारो स्थळांचा समावेश असेल. ही डिजिटल लायब्ररी एक ‘वन-स्टॉप’ माध्यम असेल, जिथे विद्यार्थी, संशोधक, वास्तुविशारद तसेच सर्वसामान्य नागरिक शहरातील समृद्ध ऐतिहासिक वारशाची माहिती मिळवू शकतील. हा प्रकल्प सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे. या प्रकल्पात लोकसहभाग आवश्यक असून, विविध ऐतिहासिक वास्तूंविषयी त्यांच्याकडे असलेले फोटो, व्हिडिओ किंवा त्यासंदर्भातील दुर्मिळ माहिती असल्यास ती माहिती csmvsmumbai@gmail.com वर द्यावी, असे मुंबईचे सीएसएमव्हीएसचे महासंचालक सब्यसाची मुखर्जी यांनी आवाहनही केले आहे.

ठळक वैशिष्ट्ये
२०२६ पर्यंत डिजिटल लायब्ररी सर्वांसाठी खुली होणार
नकाशे, अहवाल, छायाचित्रे, पोस्टकार्ड, शिल्पचित्रे, मौखिक इतिहास, व्हिडिओ यांचा समावेश
सर्वांसाठी मोफत व सहज उपलब्ध
संस्था, तज्ज्ञ व शहरप्रेमींच्या सहकार्याने हे डिजिटल संग्रहालय उभारले जाणार


काळाच्या ओघात प्रत्येक संस्कृतीमध्ये बदल होतो. मुंबईही सातत्याने बदलत होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईला जो सांस्कृतिक वारसा लाभला आहे, तो वारसा डिजिटल स्वरूपात जपणे गरजेचे आहे. म्हणूनच डिजिटल लायब्ररीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
- डॉ. सब्यसाची मुखर्जी, महासंचालक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय


मुंबई हे भारतातील पहिले शहर आहे जिथे वारसा कायदा पारित आहे; मात्र या वारशाचा अभ्यास करण्यासाठी पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही ही डिजिटल लायब्ररी संकल्पना आणली आहे. या लायब्ररीमुळे कोणालाही मुंबईचा अभ्यास आणि इतिहास जाणून घेणे अधिक सोपे होईल.
- डॉ. मंजिरी कामत, प्राध्यापक, इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ

मुंबई शहर हे स्वतःच एक जिवंत अभिलेख आहे. आम्ही जे निर्माण करीत आहोत ती फक्त इमारतींची यादी नाही, तर त्या इमारतींचे समग्र आकलन आहे. त्यांच्या बहुस्तरीय ऐतिहासिक संदर्भांसह त्यांचा अभ्यास करता येणार आहे.
- प्रा. मुस्तनसिर दळवी, वास्तू इतिहासकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com