मुंबईत पहिल्यांदाच हरित क्षेत्र मोजणी
मुंबईत पहिल्यांदाच हरित क्षेत्र मोजणी
झाडांच्या जनगणनेलाही सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : महापालिकेने शहरातील हरित क्षेत्र मोजण्याचा प्रथमच निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणासोबत सात वर्षांनंतर पुन्हा झाडांची गणना होणार आहे. या कामासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, प्रत्येक झाडावर सरासरी २२ ते २७ रुपये खर्च येणार आहे. ठेकेदारांची निवड प्रक्रिया सुरू झाली असून, या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.
सात वर्षांनंतर झाडांची नवी गणना
झाडांची जनगणना दर पाच वर्षांनी करणे आवश्यक आहे, मात्र २०१८ नंतर कोविड महामारी आणि लॉकडाऊनमुळे हे काम थांबले होते. त्यामुळे तब्बल सात वर्षांनी आता नव्याने जनगणना होणार आहे. २०१८ च्या सेन्ससनुसार मुंबईत २९ लाख झाडे नोंदली गेली होती.
झाडे तोडल्यास लावली जातात समवयस्क रोपे
पूर्वी एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे लावण्याची अट होती, परंतु जागेअभावी आता बहुधा समवयस्क म्हणजेच समान वयाची झाडे लावली जातात. बहुतांश झाडे उपनगरी भागात लावली जात असून, मियावाकी पद्धतीचाही वापर केला जात आहे. सध्या मुंबईत २३५ उद्याने, ४८० मनोरंजन स्थळे आणि सुमारे २० हजारांहून अधिक झाडे या पद्धतीने लावण्यात आली आहेत.
जीपीआर तंत्रज्ञानातून तपासणी
पालिकेच्या अभियंत्यांच्या माहितीनुसार, या सर्वेक्षणात तीन टप्पे असतील. झाडांची मोजणी, जडांची तपासणी (जीपीआर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने) आणि हरित क्षेत्राचे नकाशीकरण याचा समावेश आहे. वारंवार खोदकामामुळे झाडांच्या जडांवर परिणाम होतो आणि झाडे कोसळण्याचा धोका निर्माण होतो. जीपीआरमुळे अशा झाडांची वेळेत माहिती मिळून आवश्यक ती पावले उचलता येतील.
हरित आच्छादनाचे पहिल्यांदाच मूल्यमापन
मुंबईचे क्षेत्रफळ ४७५ चौ. किमी. आहे, परंतु त्यातील किती भाग हरित क्षेत्राखाली आहे, याची अचूक माहिती पालिकेकडे आजवर नव्हती. बांधकाम व पायाभूत प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झाली आहे. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार शहराच्या किमान ३३ टक्के क्षेत्रावर हिरवळ असणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता या सर्वेक्षणातून खरे आकडे समोर येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.