धाडसी निर्णयांनी प्रशासकीय सेवेत बनवली ओळख
धाडसी निर्णयांनी प्रशासकीय सेवेत बनवली ओळख
– डॉ. पल्लवी दराडे : कर्तृत्वाचा ठसा उमटवणारी महिला अधिकारी
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः प्रशासनात अनेक अधिकारी आपापल्या कार्यकाळात ठरावीक जबाबदाऱ्या पार पाडतात. काही अधिकारी त्यांच्या धाडसाने, संवेदनशीलतेने आणि दूरदृष्टीने समाजाच्या मनावर अमिट छाप उमटवतात. अशा कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमध्ये आयकर विभागाच्या प्रधान सचिव डॉ. पल्लवी दराडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
एमबीबीएस, एलएलबी, आयआरएस अशा बहुआयामी शैक्षणिक पात्रतेसह डॉ. पल्लवी दराडे यांनी केवळ पदांची शिडी चढली नाही, तर आपल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी बदल घडवून दाखवला. महापालिकेमध्ये कार्यरत असताना त्यांनी अनधिकृत बांधकामांविरुद्ध निर्भीड लढा दिला. महम्मद अली रोड परिसरातील दहामजली इमारतीवर कारवाई करण्याचा निर्णय घेताना मोठा दबाव होता, पण त्यांनी पोलिस आणि महिला अधिकाऱ्यांना सोबत घेऊन कारवाई करून दाखवली. डम्पिंग ग्राउंडसाठी राखीव ठेवलेली १५० हेक्टर जमीन एका कंपनीच्या बेकायदा ताब्यातून परत मिळवताना त्यांनी सुरक्षा रक्षक पाठवून प्रत्यक्षात केलेली धाडसी कृती आजही आठवली जाते.
स्वच्छतेच्या कामातही त्यांचा हातखंडा होता. सकाळी सहा वाजता स्वतः राउंडवर निघून स्वच्छतेची पाहणी करणे, अनुपस्थित कामगारांवर कारवाई करणे, फोटो काढून स्वच्छतेसाठी तातडीने आदेश देणे यामुळे कामकाजात शिस्त आली. त्यांच्या या कार्यपद्धतीने त्यांना ‘डॅशिंग अधिकारी’ म्हणून ओळख निळवीन दिली.
आदिवासी विभागातील त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. नागपूरमध्ये आदिवासी मुलांसाठी एक हजार क्षमता असणारे पहिले होस्टेल उभारले गेले, तर आश्रमशाळांसाठी तब्बल ८० पेक्षा जास्त जागा त्यांनी मिळवल्या. केवळ कागदी योजना न राहता त्यांनी प्रत्यक्षात परिणामकारक बदल घडवून आणले.
डॉ. पल्लवी दराडे सध्या आयकर विभागाच्या प्रधान सचिवपदी कार्यरत आहेत. तिथेही त्यांनी समाजसेवेच व्रत सुरूच ठेवले आहे. या केवळ एक सक्षम प्रशासक नाहीत, तर कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नवदुर्गा आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयांनी, संवेदनशील दृष्टिकोनाने आणि समाजकेंद्री कार्यशैलीने प्रशासनाला एक नवा आदर्श दिला आहे.
विद्यार्थ्यांना मोफत वस्तू देण्याचा ऐतिहासिक निर्णय
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक ९० वस्तू मोफत द्यायचा ऐतिहासिक निर्णय ही यांच्याच कार्यकाळातला. शाळा सुरू होण्याच्या आधी शालेय वस्तू पोहोचवण्यासाठी त्यांनी एक वर्षापूर्वीच निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यामुळेच विद्यार्थ्यांना वेळेवर शैक्षणिक वस्तू मिळणे शक्य झाले.
विविध पुरस्कारांनी दखल
केंद्रीय स्वच्छता पुरस्कार, आदिवासी विकासातील उत्कृष्टतेसाठीचे राज्यस्तरीय गौरव, महिला सक्षमीकरणातील योगदानासाठी मिळालेले राष्ट्रीय सन्मान या सर्व पुरस्कारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात दिसणारा आत्मविश्वास आणि समाजाचा विश्वास, ही खरी कमाई असल्याचे डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले.
आदिवावी विभागात ठसा
आदिवासी विभागात त्यांच्या कार्याचा खरा ठसा उमटला. शाळा सोडलेली मुले परत शाळेत आणणे, तरुणींना नर्सिंग, हॉटेल व्यवस्थापन, लॉन टेनिससारख्या कोर्सकडे वळवणे, हजारो विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.