
किनारी मार्गाच्या मोकळ्या भूखंडावर वनराई
१७३ एकरावर उद्याने, जैवविविधता पार्कची उभारणी
मिलिंद तांबे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः किनारी रस्ता प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या अतिरिक्त जागेचा हिरवळीसाठी वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. एकूण १११ हेक्टर (२७४ एकर) जमीन यातून ४१ हेक्टर (१०१ एकर) पार्किंग व सेवासुविधांसाठी वापरली गेली असून, ७० हेक्टर (१७३ एकर) जागा आता ‘ग्रीन झोन’ म्हणून विकसित होणार आहे. ‘सीआरझेड’च्या नियमांमुळे या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नसल्याने ती शुद्ध वनराईसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.
किनारी रस्ता प्रकल्पातील मोकळ्या जागेवर वनराई उभारण्यासाठी महापालिकेने अभिव्यक्ती स्वारस्य मागवली होती. देशभरातील नामांकित पाच कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला. अखेरीस रिलायन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी महापालिकेकडून एकाही रुपयाचा खर्च होणार नाही, तर रिलायन्स स्वतःच्या निधीतून संपूर्ण हिरवळ उभारणार आहे. या विस्तीर्ण भूखंडावर रंगीबेरंगी फुलांची बाग, मुलांसाठी खेळाची मोठी मैदाने, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचे विचाराधीन आहे. मुंबईत खेळांच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या भागातील हवामान व मातीमध्ये आवश्यक झाडे व वनस्पती तग धरण्यास सक्षम आहेत का, याचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. सोबतच मुंबईकरांसाठी मनोरंजनाची सोय म्हणून ओपन एअर थिएटर उभारले जाणार आहे.
जैवविविधतेचे संरक्षण
किनारी रस्ता प्रकल्पातील मोकळ्या जागेत जैवविविधता पार्कही उभारले जाणार आहे. यातून समुद्रातील कोरल, शिंपले, मासे आणि इतर जलचरांचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्याजवळील जैवविविधता अनुभवण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.