कर्करोग उपचारांसाठी महाकेअर फाऊंडेशनची स्थापना
कर्करोग उपचारांसाठी महाकेअर फाउंडेशनची स्थापना
सर्वसमावेशक उपचारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : राज्यातील कर्करोगग्रस्तांना सर्वसमावेशक आणि दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ३०) येथे दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अहवालानुसार राज्यातील कर्करोग रुग्णसंख्येत २०२०च्या तुलनेत २०२५ मध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाकेअर फाउंडेशनमुळे कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार राज्यभरातील १८ रुग्णालयांत त्रिस्तरीय रचना (एल-१, एल-२, एल-३) करून कर्करोग उपचार केंद्रे उभारली जाणार आहेत, तर टाटा स्मारक रुग्णालय हे शिखर (एल-१) केंद्र म्हणून काम करेल, तर मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आदी आठ शासकीय व सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये एल-२ स्तरावर कार्यरत राहतील. अंबाजोगाई, नांदेड, यवतमाळ, सातारा, जळगाव, रत्नागिरी, शिर्डी आदी नऊ रुग्णालये एल-३ केंद्रे म्हणून कार्य करतील. या केंद्रांत रेडिओथेरपी, किमोथेरपी, शस्त्रक्रिया, निदान, पॅलिटिव्ह केअर, संशोधन, औषधसुविधा, मानसिक आधार व जनजागृती उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच एल-२ स्तरावरील रुग्णालयांत पदव्युत्तर व अतिविशेषोपचार शिक्षण (एमडी, डीएम, डीएनबी, फेलोशिप) उपलब्ध होणार आहे.
१,६७७ कोटींची तरतूद
महाकेअर फाउंडेशनच्या कामकाजासाठी सुरुवातीला १०० रुपये कोटी निधी देण्यात येणार असून, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मिळणाऱ्या शुल्कांपैकी २० टक्के फाउंडेशनला देण्यात येईल. तसेच क्लिनिकल ट्रायल्स, सीएसआर, आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहाय्याने निधी उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण १,६७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फाउंडेशनचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष, तर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी व तज्ज्ञ मंडळी संचालक मंडळात असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.