आपली मुंबई सुरक्षेत चौथ्या स्थानावर
आपली मुंबई सुरक्षेत चौथ्या स्थानावर
‘राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण’चा अहवाल; सर्वाधिक गुन्हेगारी कोची, दिल्ली शहरात
जयेश शिरसाट ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः गुन्हेगारी मोडून काढण्यात, आटोक्यात ठेवण्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत मोजला जाणारा गुन्ह्यांचा दर किंवा प्रमाणानुसार (क्राइम रेट) कोलकाता, हैदराबाद, पुणे आणि मुंबई ही महानगरे अनुक्रमे पहिल्या चार स्थानांवर आहेत, तर कोची, दिल्ली, सुरत, जयपूर, इंदूर आदी शहरांमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरोने (एनसीआरबी)) नुकताच जारी केलेला ताजा अहवाल स्पष्ट करतो.
एनसीआरबीने २०२३ मध्ये भारतीय दंड संहिता आणि विशेष स्थानिक कायद्यांनुसार नोंद झालेल्या दखलपात्र गुन्हे आणि लोकसंख्या आदींची सांगड घालत विस्तृत अहवाल सादर केला आहे. या अहवालात देश, राज्य आणि महानगरांमध्ये दाखल दखलपात्र गुन्ह्यांचा ठोकताळा आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेशांसोबत २० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या १९ महानगरांची या विश्लेषणासाठी निवड करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरांचा समावेश आहे.
एनसीआरबी आणि वरिष्ठ आजी-माजी अधिकाऱ्यांनुसार नोंद गुन्ह्यांच्या आकडेवारीपेक्षा लोकसंख्येच्या तुलनेत काढला जाणारा गुन्ह्यांचा दर किंवा प्रमाण महत्त्वाचे ठरते. संबंधित प्रदेशाच्या लोकसंख्येस (लाखात) नोंद गुन्ह्यांच्या संख्येने भागून हे प्रमाण काढले जाते. एखाद्या प्रदेशात नोंद गुन्ह्यांची संख्या कमी आणि प्रमाण जास्त असल्यास ती बाब चिंतेचा विषय बनते. त्यामुळे देशातील पोलिस यंत्रणा संख्येऐवजी गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाया, उपाययोजना आखतात.
२०२३ मध्ये एकूण ११.४० कोटी लोकसंख्या असलेल्या १९ महानगरांमध्ये ९.४४ लाख दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. त्यानुसार गुन्ह्यांचे प्रमाण ८२८ अर्थात एक लाख लोकसंख्येमागे ८२८ इतके भरले.
या प्रमाणाचा विचार केल्यास कोलकातामध्ये एक लाख लोकसंख्येमागे फक्त ८४, हैदराबादमध्ये ३३२, पुण्यात ३३७ तर मुंबईत ३५५ गुन्हे घडले. या चार महानगरांमध्ये मुंबईची लोकसंख्या सर्वाधिक १.८४ कोटी आहे. कोलकाताची १.४१, हैदराबादची ७६ लाख आणि पुण्याची ५० लाख इतकी लोकसंख्या आहे. या महानगरांमध्ये २०२३ मध्ये घडलेल्या गुन्ह्यांची संख्या मुंबईत ६५, ४४१, कोलकात्यात ११,८४३, हैदराबादेत २५,७४९ तर पुण्यात १७,०२२ इतकी आहे.
या अहवालानुसार सर्वाधिक गुन्हेगारी केरळच्या कोची आणि दिल्ली शहरात असल्याचे स्पष्ट होते. कोचीतील गुन्हेगारीचे प्रमाण तब्बल ३,१९२ इतके आहे. १९ महानगरांच्या सरासरी प्रमाणापेक्षा तब्बल २,३६४ गुन्हे कोचीत अधिक घडले. त्यामागोमाग दिल्ली २,०१५, सुरत १,३७७, जयपूर १,२७७ आणि इंदूरचे प्रमाण १,१११ इतके आहे.
मुंबई, दिल्ली आणि कोचीतील तुलना
केरळच्या कोची शहराची लोकसंख्या अवघी २१ लाख असून, तिथे ६७,६१६ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झाली. दिल्लीची लोकसंख्या १.६३ कोटी (कोचीच्या आठ पट) आहे. तेथे तब्बल ३,४३,४८३ गुन्हे नोंद झाले. मुंबईची लोकसंख्या १.८४ कोटी (कोचीच्या नऊ पट) आहे, मात्र मुंबईतील नोंद गुन्ह्यांची सख्या या दोन्ही शहरांच्या तुलनेत कमी (६५,४४१) इतकी आहे.
गुन्हेगारीत मुंबई कुठे?
भारतीय दंड संहितेप्रमाणे
शारीरिक गुन्हे
हत्या, हत्येचा प्रयत्न, हाणामारी, अपहरण, बलात्कार विनयभंग, अनैसर्गिक अत्याचार, पाठलाग ॲसिड हल्ला, आत्महत्या, मानवी तस्करी, रस्त्यावरील अपघात यासह मानवी शरीराला इजा पोहोचवणे या आणि अशा मानवी शरीरास इजा पोहोचवणाऱ्या गुन्ह्यांत मुंबईचा १७ वा क्रमांक लागतो. अर्थात अशा गुन्हे प्रकारात मुंबई १७ व्या स्थानी अर्थात तिसरे सुरक्षित शहर ठरले.
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक
इंदूर ७,७२१ ३५६ १
पाटणा ५,१५४ २५२ २
जयपूर ५,९२९ १९३ ३
मुंबई ९,८३८ ५३.४ १७
एकूण ९२,६१० ८१.२ -
(तक्त्यातील क्रमांक चिंताजनक ते सुरक्षित या क्रमाने)
सार्वजनिक शांततेचा भंग
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या गुन्ह्यांत दंगल, जातीय-धार्मिक- सामाजिक सलोखा बिघडवणारी कृती, विविध कारणांवरून घडणारे वाद, आंदोलने आदींचा समावेश होतो.
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक (प्रमाणानुसार)
जयपूर ४५६ १४.८ १
कोची २६६ १२.६ २
कोझिकोडे १७२ ८.५ ३
मुंबई ३५४ १.९ ११
एकूण २,९६५ २.६ -
मालमत्तेची चोरी
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, खंडणी, मोटार वाहन चोरी, फौजदारी विश्वास घात आदी गुन्ह्यांचमध्येही मुंबईचा १३ वा क्रमांक आहे.
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक
दिल्ली २,३७,२२४ १,४५४ १
जयपूर ११,३०४ ३६९ २
पाटणा ७,०१० ३४३ ३
मुंबई १३,००२ ७० १३
एकूण ३२,८१०० २८८ -
अन्य आयपीसी गुन्हे
हुंड्यासाठी छळ, अफवा पसरवणे, ओळख बदलून फसवणूक, सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य, निष्काळजीने वाहन चालवून जखमी करणे, रहदारीचा मार्ग अडवून वाहतूक खोळंबा करणे, भेसळ आदी गुन्ह्यांत मुंबई १४ व्या क्रमांकावर आहे.
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक
कोची १९,५४४ ९२३ १
कोझिकोडे ८,३०२ ४०९ २
दिल्ली ६०,४३२ ३७० ३
मुंबई ११,६२८ ६० १४
एकूण १,८२,७८३ १६० -
महिलांविरोधी गुन्हे
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक
जयपूर ३,८७२ २६६ १
लखनऊ २,९०२ २१० २
इंदूर १,९१९ १८५ ३
मुंबई ६,०२५ ७१ १३
एकूण ५१,३९३ ९५ -
आर्थिक गुन्हे
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक
जयपूर ५,३०४ १७३ १
पाटणा १,८६१ ९१ २
लखनऊ २,४४६ ८४ ३
मुंबई ६,४७६ ३५ ११
एकूण ४१,२२० ३६ -
सायबर गुन्हे
शहर गुन्हे प्रमाण क्रमांक
बंगळूर १७,६३१ २०७ १
हैदराबाद ४,८५५ ६३ २
लखनऊ १,४५३ ५० ३
मुंबई ४,१३१ २२ ५
एकूण ३३,९५५ ३० -
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.