पावसाने उघडीप घेताच काँक्रिटीकरणाला सुरूवात
पावसाने उघडीप घेताच काँक्रीटीकरणाला सुरुवात
५७४ रस्त्यांना प्राधान्य; सर्वाधिक झोन ४ मध्ये कामे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पावसाळ्यामुळे थांबलेली मुंबईतील रस्ते काँक्रीटीकरणाची कामे आता पुन्हा सुरू होत आहेत. गेल्या चार महिन्यांच्या खंडानंतर पालिकेकडून शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रस्ते सिमेंटीकरणाचा वेग वाढविण्यात येणार आहे. प्राथमिक टप्प्यात बॅरिकेडिंग, माहिती फलक लावणे, वाहतूक विभागाकडून परवानग्या घेणे अशी कामे सुरू झाली असून, पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
पालिकेच्या माहितीनुसार, ५७४ रस्ते प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वाधिक रस्ते पश्चिम उपनगरातील झोन चारमध्ये असून, (१३२ रस्ते – ५४.३६ किमी) सर्वात कमी रस्ते शहर विभागातील झोन दोनमध्ये (३३ रस्ते – सात किमी) आहेत. मागील वेळेस पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. या वेळी मात्र काळजी घेत, कोणत्या रस्त्याचे काम कधी सुरू होणार, किती कालावधीत पूर्ण होणार याची सविस्तर माहिती पालिकेने आपल्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिली आहे. नागरिक आपल्या परिसरातील रस्त्याची स्थिती व कामाचा अंदाजित कालावधी या डॅशबोर्डवर पाहू शकतात.
कामाचे नियोजन करताना एकाच भागातील दोन ते तीन रस्त्यांची कामे एकाच वेळी सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. काँक्रीटीकरण करताना साधारणपणे ३० ते ४० मीटरचे ब्लॉक घेऊन काम करण्यात येणार आहे. सध्या दोन टप्प्यांमध्ये सुरू असलेल्या प्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यातील ६४ टक्के व दुसऱ्या टप्प्यातील ३७ टक्के रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस आहे.
झोननिहाय अंशतः पूर्ण रस्ते
झोन १ : ४३ रस्ते (५.३० किमी)
झोन २ : ३३ रस्ते (७.०० किमी)
झोन ३ : ११५ रस्ते (२८.७० किमी)
झोन ४ : १३२ रस्ते (५४.३६ किमी)
झोन ५ : ७२ रस्ते (१५.१६ किमी)
झोन ६ : ६६ रस्ते (११.६५ किमी)
झोन ७ : ११३ रस्ते (३४.६० किमी)
खड्डेमुक्त मुंबईकडे वाटचाल
काँक्रीट रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अत्यल्प असल्याचे अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीवरील खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होतो. याच पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे येत्या काळात खड्डेमुक्त मुंबईकडे वाटचाल होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.