मेट्रो-वन घाट्यातून बाहेर निघणार!
मेट्रो-वन घाट्यातून बाहेर निघणार!
एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन; स्वतंत्र अभ्यास गट, भाडेवाढीशिवाय उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : मुंबईतील पहिली मेट्रो असलेली अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो-१ मार्गिका घाट्यात चालत आहे. त्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडे मास्टर प्लॅन असून, त्यांच्याकडून तिकीटवाढीशिवाय मेट्रोच्या जागेत जाहिराती लावणे, स्थानकातील जागा भाड्याने देणे, अशा अन्य मार्गाने उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सदर पर्यायांवर अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांचा अभ्यास गट तयार करण्यात आला आहे.
मुंबईकरांना वाहतूक कोंडीमुक्त गारेगार प्रवास करता यावा म्हणून एमएमआरडीए आणि रिलायन्सने खासगी-सार्वजनिक भागिदारीतून सुमारे ११ किलोमीटर लांबीची घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो मार्गिका २०१४ मध्ये कार्यान्वित केली आहे. या मेट्रो मार्गिकेने दररोज जवळपास पाच लाख मुंबईकर प्रवास करत असल्याने घाटकोपर, साकीनाका, अंधेरी या परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाली आहे. तरीही मेट्रो तोट्यात धावत आहे. त्यामधून बाहेर काढण्यासाठी याआधी एमएमआरडीए आणि मेट्रो-वन प्रशासन तिकीट वाढवण्याबाबत विचार करत होते, मात्र तो पर्याय मागे पडला असून, एमएमआरडीएने आता तिकिटाशिवाय इतर मार्गाने उत्पन्न कसे वाढवता येईल, त्याबाबत विचार सुरू केला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्याबाबत अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे अभ्यास गटाकडून काय अहवाल येणार, त्यात काय बाबी समोर येतील, त्यावर पुढील निर्णय ठरणार आहे.
उत्पन्नाचे मार्ग
- मेट्रो-वन मार्गावर सुमारे ५०० पिलर्स असून, त्यावर जाहिरात करणे, डिजिटल जाहिरातीसाठी उपलब्ध करून देणे.
- मेट्रो स्थानकातील रिकाम्या जागा वेगवेगळ्या ब्रॅंडला स्टॉलसाठी भाड्याने देणे. येथील प्रवासीसंख्या मोठी असल्याने अनेक जण त्यासाठी पुढे येऊ शकतात.
- मेट्रोच्या डीएन नगर डेपोत मेट्रोची सहा मजली इमारत आहे. त्याचा बहुतांश भाग रिकामा आहे. त्यामुळे तो व्यावसायिकांना भाड्याने देणे.
- या सर्व घटकांमधून नियमित उत्पन्न मिळू लागल्यास मेट्रो-वनचा घाटा कमी करून कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होऊ शकेल, असे काही अधिकाऱ्यांचा विचार आहे.
मेट्रोचे डबे वाढवणे
मेट्रोने दररोज पाच लाख प्रवासी ये-जा करतात, मात्र सध्या केवळ चार डब्यांच्या मेट्रो ट्रेन असल्याने सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांची मोठी गैरसोय होते. गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चारऐवजी सहा डब्यांची मेट्रो ट्रेन करण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबई मेट्रो प्रायव्हेट लिमिटेडचे वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
- रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा हिस्सा - ७४ टक्के
- एमएमआरडीएचा हिस्सा - २६ टक्के
- मेट्रो-वनचा खर्च - ४०२६ कोटी, (मात्र २३५६ कोटी रुपये खर्च झाल्याचा एमएमआरडीएचा दावा)
- एकूण कर्ज - ३,००० कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.