मुंबईकर  वाहन परवाना विसरत नाहीत

मुंबईकर  वाहन परवाना विसरत नाहीत

Published on

मुंबईकर  वाहन परवाना विसरत नाहीत
विनापरवाना प्रकरणांमध्ये झाली ५० टक्के घट; डिजिलॉकरचा फायदा
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ५ :  मुंबईत दिवसेंदिवस   विनापरवाना (परमिट) प्रकरणांमध्ये ५० टक्‍के घट झाली आहे. यामध्ये अकीकडे  डिजिलॉकरचा फायदा होत आहे, तर दुसरीकडे  १० ते २० हजार दंडाची रक्कम असल्याने त्याची मुंबईकरांना धास्ती आहे. त्यामुळेच  मुंबईकर वाहन परवाना विसरत नाहीत. वाहतूक पोलिसांच्या २०२४ चलन अहवालानुसार ५४९ जणांवर विनापरमिट कारवाई केली आहे.  
 विनापरवाना वाहन चालवल्‍यास दंड होऊ शकतो, मात्र दंडापेक्षाही परवाना नसेल आणि अपघात झाला, तर आयुष्य उद्‌ध्वस्‍त होऊ शकते. त्यामुळे विनापरवाना वाहन चालवणे कटाक्षाने टाळलेच पाहिजे. वाहनधारक किंवा वाहन चालविणारा व्यक्ती हा वाहन चालविण्यास योग्य आहे.  विनापरवाना वाहन चालवणाऱ्यास नवीन मोटार वाहन कायद्यानुसार १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे.  मालकाला १० हजार व इतर व्यक्ती वाहन चालवत असल्‍यास मालकाचे १० आणि त्या व्यक्तीचे १० असे एकूण २० हजार दंड आकारला जात आहे .
विनापरवाना वाहन पकडले, तर दंड भरून सुटका होऊ शकते, मात्र वाहन परवाना नसताना तुमच्याकडून अपघात झाल्‍यास मनस्तापाशिवाय काहीही पर्याय नाही. अपघात किरकोळ असल्‍यास वाहनाचे नुकसान भरून कदाचित सुटका होऊ शकते, मात्र अपघातात कुणाचा मृत्यू झाल्‍यास मात्र वसुलीच्या दाव्याला सामोरे जावे लागते.
वाहनचालकाकडे वैध वाहन परवाना असणे ही विमा मिळवण्यासाठीची प्रमुख अट आहे. अपघातातील मृताच्या कुटुंबाने नुकसानभरपाईचा दावा टाकला आणि वाहन परवाना नसल्यास तो दावा वाहन चालवणाऱ्याच्या अंगावर पडतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय, त्याच्यावर अवलंबून असणारे व्यक्ती आणि त्याची एकूण राहिलेली सेवा किंवा त्याचा व्यवसाय याचा एकत्र हिशेब करून हा दावा मोटार अपघात न्यायाधिकरणाकडून मंजूर केला जातो.
हा दावा हजारापासून ते ५० ते ६० लाख किंवा अधिकही असू शकतो. त्यामुळेच विनापरवाना वाहन चालवणे आयुष्य उद्‌ध्वस्‍त करू शकते, याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

विनापरमिट कारवाईत  परवाना घरी विसरलो हे कारण जास्त असायचे, पण आता डीजी लॉकरचा  पर्याय असल्याने ऑनलाइन परवाना दाखवता येतो. तसेच दंडाची रक्कम जास्त आहे. त्यामुळे विनापरवाना वाहन चालवण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले आहे, असे एका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

सर्वात कमी विनापरमिट कारवाई वाहतूक विभाग 
आझाद मैदान -०
विक्रोळी - ०
डी बी मार्ग - ० 
ताडदेव - ० 
वडाळा - ०

वांद्रे - ५३ 
वाकोला - ५१ 
दिंडोशी - ४६ 
मानखुर्द - ४५ 
माटुंगा - ३३

Marathi News Esakal
www.esakal.com