ताडदेवच्या महागड्या घरांची हातोहात विक्री होणार

ताडदेवच्या महागड्या घरांची हातोहात विक्री होणार

Published on

ताडदेवच्या महागड्या घरांची हातोहात विक्री होणार
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने घरे विकण्यास म्हाडा प्राधिकरणाची मंजुरी; लवकरच जाहिरात निघणार
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : म्हाडाने दोन वेळा लॉटरीत समावेश करूनही विक्री न झालेल्या ताडदेव येथील महागड्या घरांची आता हातोहात विक्री होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या सहा-सात कोटी रुपये किंमत असलेल्या सात घरांचा वारंवार लॉटरीत समावेश करूनही ती विकली जात नसल्याने लवकरच प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वाने विक्री करण्यास म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या घरांच्या विक्रीसाठी स्वतंत्र जाहिरात काढली जाणार असल्याने इच्छुकांना कागदपत्रांच्या कोणत्याही कटकटीशिवाय केवळ किंमत भरून घर घेता येणार आहे. दरम्यान, या घरांची सध्या असलेली मूळ किंमत कायम ठेवली जाणार आहे.
राज्याच्या गृहनिर्माण धोरणातील तरतुदीनुसार गृहप्रकल्प राबवताना संबंधित विकसकांनी हौसिंग स्टॉक, प्रीमियमच्या माध्यमातून म्हाडाला ठरावीक घरे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार २०२२-२३ मध्ये एका खासगी विकसकाकडून म्हाडाला ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमध्ये आठ घरे मिळाली आहेत. त्याच्या विक्रीसाठी म्हाडाने दोन वेळा लॉटरीत समावेश केला, परंतु त्याची विक्री होऊ शकलेली नाही. त्यानंतर ही घरे सेवा निवासस्थान म्हणून म्हाडा अधिकारी-कर्मचाऱ्यांना देण्याच्या हालचाली म्हाडाने केल्या, मात्र तोही प्रयत्न यशस्वी झालेला नाही. त्यामुळे या घरांचा लॉटरीशिवाय प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्री करता यावी, म्हणून म्हाडा प्राधिकरणाने नुकतीच मंजुरी दिली आहे. याशिवाय यापुढे दोन वेळा लॉटरीत समावेश करूनही घराची विक्री न झाल्यास प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने विक्री करणे शक्य होणार आहे.

ऑनलाइन अर्ज घ्यावे लागणार
महागड्या विक्री न झालेल्या घरांची संख्या कमी आहे. तसेच किमतही निश्चित आहे. त्याची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर करण्यासाठी निश्चित दिवशी, निश्चित वेळेत ऑनलाइन अर्ज मागवावे लागतील. त्यासाठी म्हाडाला आधी जाहिरात करावी लागणार आहे.

चार्जेस म्हाडा भरणार
विकसकाने २०२२-२३ मध्ये म्हाडाला या घरांचा ताबा दिला आहे. त्यामुळे या घरांचा वापर नसतानाही दुरुस्‍तीखर्चापोटी म्हाडाला दर महिन्याला दीड-दोन लाख रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे आतापर्यंत हा खर्च लॉटरी विजेत्यांवर टाकला जात होता, मात्र आता म्हाडा स्वतः सदरचे सर्व चार्जेस भरणार आहे. त्यामुळे घर घेणाऱ्याला निव्वळ किमतीत घर मिळू शकणार आहे.

क्रिसेंट टॉवरमधील घरांचा विक्रीसाठी दोन वेळा लॉटरीत समावेश केला होता, मात्र त्याला प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वाने सदरची घरे विकण्यास म्हाडा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार घराच्या विक्रीसाठी लवकरच जाहिरात काढली जाईल. त्यामध्येही विक्री न झाल्यास ती भाड्याने दिली जातील.
- अनिल वानखडे,
उपमुख्य कार्यकरी अधिकारी, म्हाडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com