कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी

कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी

Published on

कोल्ड्रिफ कफ सिरपच्या दूषित बॅचवर बंदी
महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी; जप्तीचे निर्देश

भाग्यश्री भुवड, सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कोल्ड्रिफ कफ सिरप (बॅच एसआर-१३)च्या वापरावर तत्काळ बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. एफडीएने राज्यातील सर्व घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते आणि रुग्णालयांना या बॅचमधील सिरप वापरणे थांबवण्याचे आणि जप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोल्ड्रिफ सिरप खाल्ल्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १२हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. सिरपच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आणि त्यात डायथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळले, जे किडनीवर गंभीर परिणाम करू शकते. या घटनेनंतर मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळने सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र एफडीएदेखील सतर्क झाला आहे. एफडीएच्या मते, प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे, की बॅच क्रमांक एसआर-१३ मधील कोल्ड्रिफ सिरप डायथिलीन ग्लायकोल नावाच्या विषारी रसायनाने दूषित आहे. हे सिरप श्रीसन फार्मा, सनगुवरचत्रम, कांचीपुरम जिल्हा, तमिळनाडू यांनी तयार केले होते. या बॅचची उत्पादन तारीख मे २०२५ आणि समाप्ती तारीख एप्रिल २०२७ आहे. म्हणून सर्व परवानाधारक, किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते, रुग्णालये आणि सामान्य जनतेला विनंती आहे, की त्यांनी या बॅचमधील कोणत्याही साठ्याची विक्री, वितरण किंवा वापर तत्काळ थांबवावा आणि स्थानिक औषध नियंत्रण प्राधिकरणाला कळवावे.
...
तपासणी सुरू
महाराष्ट्र एफडीएने सांगितले, की तमिळनाडू औषध नियंत्रण अधिकाऱ्यांशी समन्वय साधून राज्यात त्याची उपलब्धता रोखण्यासाठी या बॅचच्या पुरवठा साखळीचा मागोवा घेतला जात आहे. सर्व औषध निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांना दुकानदार आणि रुग्णालयांना तत्काळ सतर्क करण्याचे आणि आढळणारा कोणताही साठा जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एफडीए महाराष्ट्रने सांगितले, की या प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जात आहे आणि जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. एफडीए आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले, की तपासणी सुरू आहे. सर्व अधिकारी आणि औषध विक्रेत्यांनाही सतर्क करण्यात आले आहे.
.....
येथे करा तक्रार
नागरिक संबंधित कोणतीही तक्रार थेट एफडीए महाराष्ट्रला १८००-२२२-३६५ या टोल-फ्री क्रमांकावर, jchq.fda-mah@nic.in या ईमेल क्रमांकावर किंवा ९८९२८३२२८९ या मोबाईल क्रमांकावर करू शकतात, असेही कळविण्यात आले आहे.
...
कोरड्या खोकल्याचे सिरप टाळा!
मध्य प्रदेशात मुलांच्या मृत्यूनंतर कोल्ड्रिफ सिरपच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बालरोगतज्ज्ञ डॉ. फैसल नबी यांनी सांगितले, की मुलांना कोरड्या खोकल्याचे सिरप लिहून देऊ नये. हे सिरप अनेक औषधांच्या मिश्रणापासून बनवले जाते. यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. ॲलर्जी किंवा कफसंबंधित खोकल्यासाठी स्वतंत्र औषधे सुरक्षित मानली जात असली, तरी वैद्यकीय समुदाय याबद्दल सावध आहे.
...
सुरक्षित वापराचे प्रशिक्षण द्या!
इंडियन पेडियाट्रिक असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खलटकर यांनी सांगितले, की ओव्हर द काउंटर कफ सिरप - म्हणजेच प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध होणार - धोकादायक असू शकतात. विशेषतः पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी. कफ सिरप अशी विकली जाणार नाहीत याची खात्री करावी. दम्याच्या मुलांना ड्राय कफ सिरप अजिबात देऊ नये. कारण ते दम्याचा झटका वाढवू शकतात आणि श्वसनाच्या समस्या वाढवू शकतात. आयएपीने आधीच स्पष्ट केले आहे, की ड्राय कफ सिरपचा वापर टाळावा आणि केवळ पात्र बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच दिला पाहिजे. भविष्यातील घटना टाळण्यासाठी त्यांनी नॉन-अ‍ॅलोपॅथिक आणि जनरल प्रॅक्टिशनर्सना कफ सिरपच्या सुरक्षित वापराचे प्रशिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी सरकारला केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com