अतिरिक्त रक्तसंकलनावर अंकुश

अतिरिक्त रक्तसंकलनावर अंकुश

Published on

अतिरिक्त रक्तसंकलनावर अंकुश
साठ्याचा गरजेच्या जिल्ह्यांत पुरवठा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. मात्र या वेळी गरजेपेक्षा अधिक रक्तसंकलन होऊन त्यातील काही प्रमाणात मुदतबाह्य होत असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) विशेष पाऊल उचलले आहे. राज्यात प्रथमच एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली असून, अतिरिक्त रक्त असलेल्या जिल्ह्यांमधून कमतरता असलेल्या जिल्ह्यांपर्यंत रक्ताचे नियोजनबद्ध स्थलांतर होणार आहे.
एसबीटीसीने पूर्वीही रक्तदान शिबिर आयोजकांना मागील तीन वर्षांच्या सरासरी मागणीचा विचार करूनच रक्तसंकलन करावे, अशा सूचना दिल्या होत्या. असे असतानाही काही रक्त केंद्रांनी गरजेपेक्षा अधिक संकलन केल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे काही युनिट्स रक्त वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, नंदुरबारसह काही जिल्ह्यांमध्ये रक्तसाठा अपुरा असल्याचे समोर येत आहे. या परस्परविरोधी परिस्थितीवर राज्य परिषद सातत्याने लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, राज्य रक्त संक्रमण परिषदेतील समन्वयक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त साठा असलेल्या केंद्रांहून कमी साठा असलेल्या जिल्ह्यांकडे रक्ताचे स्थलांतर नियोजित करण्यात येत आहे.
...
येथे साठा उपलब्ध
- पंढरपूर बजाज ब्लड सेंटरकडे एकूण ३० पीसीव्ही युनिट्सचा साठा आहे. यामध्ये बी पॉझिटिव्ह १५, ए पॉझिटिव्ह ५ आणि ओ पॉझिटिव्ह १० युनिट्सचा समावेश असून, या युनिट्सची अंतिम मुदत १२ आणि १६ ऑक्टोबर २०२५ अशी आहे.
- पुणे आणि नारायणगाव येथील रक्त केंद्रांनीही आपल्या अतिरिक्त साठ्याची माहिती परिषदेशी शेअर केली आहे. पुणे केंद्राकडे बी पॉझिटिव्ह २३ आणि ओ पॉझिटिव्ह ११ युनिट्स (१२ ऑक्टोबरपर्यंत वैध) आहेत, तर नारायणगाव केंद्राकडे ए पॉझिटिव्ह ११, बी पॉझिटिव्ह नऊ, ओ पॉझिटिव्ह २० आणि एबी पॉझिटिव्ह नऊ युनिट्स (१५ आणि १६ ऑक्टोबरपर्यंत वैध) आहेत.
- पुण्यातील महा ब्लड सेंटर आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलेसेमिया डे केअर सेंटर यांनीही आपला साठा इतर रक्तपेढ्या व रुग्णालयांना तातडीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. रक्तसाठा मर्यादित कालावधीपर्यंत वापरण्यायोग्य असल्याने गरज असलेल्या जिल्ह्यांतील रक्तपेढ्यांनी या केंद्रांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन परिषदेने केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com