आरोग्‍य व्यवस्‍थापन माहिती प्रणालीमध्ये अडथळे कायम

आरोग्‍य व्यवस्‍थापन माहिती प्रणालीमध्ये अडथळे कायम

Published on

आरोग्‍य व्यवस्‍थापन माहिती प्रणालीमध्ये अडथळे कायम
केईएममध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू; रुग्‍णांची गैरसोय कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प ‘एचएमआयएस’ म्हणजे आरोग्‍य व्यवस्‍थापन माहिती प्रणालीमध्ये अडथळे कायम आहेत. केईएम रुग्णालयात ‘एचएमआयएस’ ही पद्धत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे, मात्र संगणकीकृत प्रणाली अद्याप सुरळीत कार्यान्वित झालेली नाही. दरम्यान, प्रणालीच्या त्रुटीविषयी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
रुग्णांची सर्व नोंद ऑनलाइन पद्धतीने करण्यामध्ये अनेक अडथळे येत आहेत. सॉफ्टवेअरमधील त्रुटी, विविध विभागाच्या वेगवेगळ्या अत्याधुनिक आणि जुन्या मशीन या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक पनवाना, जोडणीच्या समस्या आणि तांत्रिक मनुष्यबळाच्या अभावामुळे अनेक विभागांतील कामकाज विस्कळित झाले आहे. डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारीवर्ग सततच्या तांत्रिक अडचणींमुळे त्रस्त झाले आहेत, तर रुग्णांनाही नोंदणीपासून ते प्रत्यक्षात उपचार मिळेपर्यंत अनेक तासांची वाट पाहावी लागत आहे. या ऑनलाइन पद्धतीमुळे भविष्यात सांकेतिक डेटा मिळवणे सोपे होणार असले तरी सद्यस्थितीत बरेचसे विभाग एकमेकांशी जोडले गेले नसल्याने रुग्ण आणि पाहिल्या फळीत असणारे डॉक्टर त्रस्त झाले आहेत.
प्रत्येक मशीनसाठी स्वतंत्र परवाना आवश्यक असल्याने आर्थिक भार वाढला आहे. काही मशीनच्या परवान्याची मुदत संपल्याने नवे लायसन्स घ्यायचे की नवीन मशीन मागवायचे, याबाबत प्रशासन संभ्रमात आहे.

रुग्‍णालयाची नोंदणी करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ही पद्धत चांगली असली तरी अंमलबजावणी योग्य नियोजनाशिवाय सुरू केल्याने अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येक विभागाचे मशीन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवर कार्यरत असल्याने त्यांचे एकात्मीकरण पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो. सध्या सर्व्हर स्थिर नाही आणि काही विभागांतील उपकरणे नेटवर्कशी जोडलेली नाहीत.

यंत्रणांचे एकीकरण प्रलंबित
रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या ७० ते ८० टक्के मशीन प्रणालीशी जोडली गेली असली, तरी उर्वरित २० ते ३० टक्के यंत्रणांचे एकीकरण प्रलंबित आहे. विशेषतः किरणोपयोजनशास्त्र, पोटाशी संबंधित आजार, रक्‍तपेढी, फॉरेन्सिक आणि एमएसडब्ल्यू विभागात सॉफ्टवेअर अद्ययावत करणे आणि परवाना प्रक्रियेमुळे कामकाज अपूर्ण राहिले आहे.

रुग्‍णांमध्ये नाराजी
रुग्णालय प्रशासनाकडून एचएमएस प्रणाली अधिक कार्यक्षम करण्यासाठी सॉफ्टवेअर कंपनीशी सतत संपर्क ठेवला जात आहे. दरम्यान, सॉफ्टवेअरमधील सततच्या बदलांमुळे आणि अभियंते योग्य वेळी उपलब्ध होत नसल्याने सुधारणा कार्यात विलंब होत आहे. त्यामुळे रुग्णसेवेत गती कमी झाली असून, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींना वेळीच प्रतिसाद न मिळाल्याने नाराजी वाढत आहे, असे संबंधित कर्मचाऱ्याने सांगितले.

काय आहेत त्रुटी?
सर्व्हर वारंवार डाऊन होणे, संगणक अचानक बंद पडणे, नेटवर्क नसणे, नोंदणी केंद्रावर टायपिंगचा वेग कमी असल्याने रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते, प्रशिक्षित तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता, अपुरे मनुष्यबळ

एचएमआयएस या प्रणालीवर वारंवार बैठका घेतल्‍या जात आहेत. त्‍यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्‍न सुरू आहे.
डॉ. नीलम अंद्राडे,
संचालक, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com