हजारांमध्ये तिघांना ‘सेरेब्रल पाल्सी’ची शक्यता
हजारांमध्ये तिघांना ‘सेरेब्रल पाल्सी’ची शक्यता
वेळीच लक्षणे ओळखण्याची गरज; वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः मुंबईमध्ये हजार बालकांमध्ये तिघांना ‘सेरेब्रल पाल्सी’ची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही एक मज्जासंस्थेशी संबंधित अशी स्थिती आहे, की मेंदूला झालेल्या नुकसानामुळे किंवा असामान्य विकासातून उद्भवते. शरीराच्या हालचाली, समन्वय, संतुलन, स्नायूंची रचना बिघडते. ही स्थिती जन्मापूर्वी, जन्मादरम्यान किंवा त्यानंतर लगेचच होणाऱ्या मेंदूच्या हानीमुळे उद्भवते आणि ती कायमस्वरूपी असते; परंतु लवकर ओळख आणि उपचाराने जीवनमान सुधारता येते; मात्र हीच स्थिती पालकांनी तत्काळ ओळखून उपचार करणे आवश्यक आहे.
पालकांनी वर्षातून किमान चारदा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. उपचारांमध्ये स्नायूंचा ताठरपणा, अशक्तपणा किंवा अनियंत्रित हालचालींवर नियंत्रण मिळवले जाते. शारीरिक हालचाली शिकवणे गरजेचे आहे, असे नायर रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉ. संतोष कोंडेकर म्हणाले.
‘सेरेब्रल पाल्सी’ म्हणजे काय?
‘सेरेब्रल पाल्सी’ याला बाल मेंदू पक्षाघात असेही म्हटले जाते. शरीराची एक बाजू किंवा दोन्ही बाजू मेंदूच्या अडथळ्यांमुळे कार्य करत नाहीत. मेंदूची वाढ खुंटते. स्नायूंची ताकद कमी होत असल्यामुळे बाळाची वाढ योग्यरीत्या होत नाही. जन्मादरम्यानही किंवा जन्मानंतरही ही समस्या उद्धवू शकते. शरीराची हालचाल व्यवस्थित होत नाही. बाळाचे चालणे, वागणे, बोलणे, भाषा ओळखणे, नजर मिळवणे, हालचाल न करणे यात बदल होतो. हा आजार वाढणारा नसतो; पण मेंदूच्या वाढीमुळे शरीरात इतर बदल होत जातो. दरवर्षी ६ ऑक्टोबर हा दिवस ‘सेरेब्रल पाल्सी’ दिवस म्हणून पाळला जातो. जन्मलेल्या बाळाला जन्मापासून असणाऱ्या समस्यांविषयी जनजागृती केली जाते.
बालरोगतज्ज्ञांच्या मते मुंबईत हजार बाळांच्या जन्मामध्ये तिघांना सेरेब्रल पाल्सीची लक्षणे दिसून येतात. तर भारतात ही स्थिती वाढताना दिसतेय. भारतात १७ लाख तर, राज्यात दहामध्ये दोन रुग्ण अशा समस्यांचे आढळतात. गर्भावस्थेत बाळाचे वजन कमी, रक्तपुरवठा कमी झाल्यास ही स्थिती उद्भवते. अतिशीघ्र उपचार करणे गरजेचे असून या आजाराला कोणतेही मूळ कारण नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लक्षणे कोणती?
पहिल्या सहा महिन्यांत बाळ एका कुशीवर वळते, नजर मिळवते, बसण्याचा प्रयत्न करते. एक ते दोन वर्षांची मुले ऐकू, चालू किंवा बोलू शकतात; पण या शरीराच्या हालचाली होत नाहीत. मेंदूला फक्त एकच अडथळा होतो असेही नाही, अनेकदा अपस्मार, फिट येणे, नजरेचा अंधुकपणा असणे, समज न येणे, स्वमग्नताही असू शकते. एकंदरीत बाळाला जगाची ओळख होण्यास वेळ लागतो. सहजा दोन वर्षांची मुले पेन, पेन्सिल घेऊन लिहिण्यास सुरुवात करतात.
जन्मपूर्व आणि जन्मादरम्यानची कारणे
गर्भधारणेदरम्यान मेंदूचा असामान्य विकास, संसर्ग किंवा काही औषधांचा परिणाम यामुळे ही समस्या उद्भवू शकते. आयुष्याच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळेदेखील ही समस्या उद्धभवते. अनेकदा सेरेब्रल पाल्सीचे नेमके कारण अज्ञात असते.
उपचार काय?
‘सेरेब्रल पाल्सी’वर कोणताही पूर्ण उपचार नाही; परंतु लवकर निदान आणि योग्य उपचारांमुळे व्यक्तीचे जीवनमान सुधारू शकते. यामध्ये शारीरिक उपचार, बोलण्याची थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि योग्य औषधांचा समावेश असतो.
सेरेब्रल पाल्सीचे प्रकार मेंदूच्या कोणत्या बाजूला अडथळा आहे, त्यानुसार बदलू शकतो. एकांगी म्हणजे एका बाजूला समस्या असते. दिव्यांगी म्हणजे दोन्ही बाजूंना समस्या होते. मेंदूत प्रत्येक भागासाठी एक विशेष जागा ठरलेली आहे. हाता-पायांत विकृती तयार होते. चालण्याचे प्रकार बदलतात. हे पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. मातेच्या गरोदरपणात सर्व तपासण्या, तिचा आहार, तिची सोनोग्राफी सर्व चाचण्या वेळीच झाल्या पाहिजेत.
- डॉ. संतोष कोंडेकर,
प्राध्यापक- बालरोग विभाग, नायर रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.