सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा!

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा!
Published on

सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा!
दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि गोड पदार्थांची मागणी वाढते. या काळात दुग्धजन्य पदार्थांत भेसळ होण्याची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या नावाने विशेष तपासणी मोहीम राबविणार आहे.
या मोहिमेत राज्यात नमुने गोळा कारण्यासोबत नागरिकांना प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमांतून मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न होणार आहेत.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवरदेखील लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. मोहिमेदरम्यान अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांना टोल फ्री क्रमांक १८००-२२२-३६५ वर तक्रारी करता येतील.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पुरवठा कमी आणि मागणी जास्त असतानाही भेसळ टाळण्यासाठी नागरिक, अन्न व्यावसायिक आणि शासनाने एकत्र काम करावे, असा आग्रह धरला. मोहिमेच्या उद्‌घाटनावेळी भेसळयुक्त अन्न खाल्ल्याचे परिणाम दर्शविणारे नाटक आणि चित्रफीत सादर करण्यात आली, तसेच अन्न व्यावसायिकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
या मोहिमेचा उद्देश नागरिकांना चांगल्या प्रतीची मिठाई व फराळ उपलब्ध होणे हा आहे. मात्र ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना सजग राहण्याचे आवाहन एफडीए प्रशासनाने केले आहे. याशिवाय मिठाईची मुदत संपण्याची ही तारीख त्यावर लिहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिठाई व गोड पदार्थ नाशवंत असतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन, साठवणूक, मुदतबाह्य तारीख आणि कच्च्या मालाची माहिती दिली जाणे आवश्यक आहे. एफडीएने यावर विशेष लक्ष देत तळण्यासाठी एकाच तेलाचा वापर, कृत्रिम रंग निर्धारित मात्रेपेक्षा जास्त न वापरणे आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन झाले आहे का, याबाबत तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com