अनुवादावर आज राष्ट्रीय परिषद
अनुवादावर आज राष्ट्रीय परिषद
मुंबई, ता. १० ः मुंबईतील सोमैया विद्याविहार विद्यापीठाचे ‘के. जे. सोमैया स्कूल ऑफ लँग्वेजेस ॲण्ड लिटरेचर’ आणि ‘आंतरभारती अनुवाद केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. ११) सकाळी १० ते पाच या वेळात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
‘भाषिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात अनुवादाचे महत्त्व’ या प्रमुख विषयावर ही परिषद होणार असून ही परिषद अभ्यासक, अनुवादक आणि इतर क्षेत्रातील विचारवंतांना अर्थपूर्ण विचार विनिमयासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
राष्ट्रीय परिसंवादाचे उद्दिष्ट अनुवादाकडे केवळ संवादाचे माध्यम म्हणून न पाहता, सांस्कृतिक देवाणघेवाण करत भाषांतरांच्या माध्यमातून आपल्या साहित्यिक व वैचारिक परंपरेचे संवर्धन करणे हे आहे. कवयित्री नीरजा, डॉ. माया पंडित, कवी आणि अनुवादक प्रफुल्ल शिलेदार, डॉ. हेमंत राजोपाध्ये, विनोद पटेल, शोभा नाईक सहभागी होत आहेत. अनुवादक करुणा गोखले तसेच चित्रपट अभ्यासक आणि लेखक गणेश मतकरी पुरस्कार विजेते अनुवादक अभिजित रणदिवे यांची मुलाखत घेतील. या राष्ट्रीय चर्चासत्रास अनुवादक आणि भाषाभ्यासक उपस्थित राहू शकतील, अशी माहिती सोमैया विद्याविहार विद्यापीठाच्या भाषा व साहित्य विद्या शाखेच्या डीन डॉ. वीणा सानेकर यांनी दिली.