उर्दू साहित्य रसिकांची संख्या वाढतेय!
उर्दू साहित्य रसिकांची संख्या वाढतेय!
आयकॉनिक पुस्तकांची मागणी कायम
विनोद राऊत : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ ः अलीकडे उर्दू भाषेला विशिष्ट समुदायाशी जोडून हिणवण्याचा प्रयत्न होत असला तरीही उर्दू साहित्याच्या वाचकांची, प्रशंसकांची संख्या सातत्याने वाढत आहे. गालिब, शकील बदायुनी, फैज अहमद फैज, साहिर लुधियानवी, कवी इकबाल, सदआदत हसन मंटो यांच्यासारख्या नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांना अजूनही जोरदार मागणी आहे, अशी माहिती उर्दू प्रकाशकांनी दिली आहे.
उर्दू अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वरळी येथील डोम सभागृहात नुकताच ‘बहार-ए-उर्दू’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले हाेते. या महोत्सवात दिल्ली आणि मुंबईतील नामवंत उर्दू प्रकाशक संस्थांनी सहभाग घेतला. ‘सकाळ’ने या महोत्सवात सहभागी झालेल्या काही प्रमुख प्रकाशकांशी संवाद साधला. तीन दिवसांच्या या महोत्सवात फारशी पुस्तक विक्री झाली नाही; मात्र वाचकांचे मत जाणून घेणे महत्त्वाचे ठरल्याचा सूर या प्रकाशकांचा होता.
दिल्लीस्थित नमक प्रकाशन संस्थेचे संचालक आरीश यांनी ‘सकाळ’ला सांगितले, की उर्दू साहित्याविषयी अनेकदा नकारात्मक बोलले जाते; मात्र प्रत्यक्षात वाचनसंस्कृती अजूनही जिवंत आहे. कोविडनंतर आमच्या संस्थेने हिंदी आणि उर्दू साहित्यावर भर दिला आणि वाचकसंख्या लक्षणीय वाढली. २०२४मध्ये प्रकाशित केलेले कवी इकबाल यांचे ‘दीवान-ए-इकबाल’ आणि मंटो यांचे ‘जप्तशुदा अफसाने’ या पुस्तकांना वाचकांची सर्वाधिक मागणी आहे.
मुंबईतील किताबदार प्रकाशन संस्थेचे आलमगीर मुन्ना यांनी सांगितले, की शकील बदायुनी, परवीन शाकिर, अहमद फराज, जाननिसार अख्तर यांच्या पुस्तकांना वर्षभर मागणी असते; मात्र अलीकडे मोबाईल आणि समाजमाध्यमामुळे वाचनाची सवय कमी होत चालली आहे. त्याचा परिणाम उर्दू साहित्यावर झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी संलग्न असलेले राजेंद्र जोशी हे या महोत्सवासाठी मुंबईला आले. ते प्रत्येक उर्दू महोत्सवाला हजेरी लावतात. या वेळी काही दुर्मिळ पुस्तके मला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ५६ वर्षांची परंपरा असलेल्या सैफी पब्लिकेशन संस्था, उर्दू भाषेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देते. उर्दू-मराठी शब्दकोश, उर्दू शिकण्याचा कोर्स ही त्यांची पुस्तके वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. पु. ल. देशपांडे, डॉ. राम पंडित यांच्या साहित्याचा उर्दू अनुवाद असे साहित्य त्यांच्या संस्थेने प्रकाशित केले आहे. नौशाद, गुलजार, दिलीप कुमार यांच्या आत्मचरित्रांनाही मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
....
पुस्तक विक्री होणार नाही, याची जाणीव होती; मात्र यानिमित्ताने वाचकांशी थेट संवाद झाला. ही संधी मला सोडायची नव्हती.
- जोहर युसूफ अली, सैफी प्रकाशन
..
महोत्सवात मला नवीन पुस्तके मिळाली. ‘फारसी पत्रसंग्रह’ आणि ‘शब्दकोष’ मिळाल्याने पुणे-मुंबई प्रवास सार्थ ठरल्याचे समाधान आहे.
- राजेंद्र जोशी, वाचक
...
कोविडनंतर उर्दू साहित्याचे वाचक वाढवले. लखनौ पुस्तक प्रदर्शनात काही लाख रुपयांची पुस्तके विक्री झाली.
- अंजूम आमीर खान, संचालक, नमक प्रकाशन संस्था
..
कोविडनंतर परिस्थिती वाईट आहे. पुस्तक प्रकाशन आणि विक्री दोन्हींवर परिणाम झाला आहे. आजपर्यंत सर्वात कमी पुस्तक विक्री या उत्सवात झाली.
- मुल्ला आलमगीर, किताबदार प्रकाशन
...
या बातमीचे फोटो बाटे यांनी पाठवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.