सायन रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण क्षमता चारपट वाढणार!

सायन रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण क्षमता चारपट वाढणार!

Published on

सायन रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण क्षमता चारपट वाढणार!
नोव्हेंबरपासून विस्तारित केंद्र सुरू; १० वर्षांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई महापालिकेच्या लोेकमान्य टिळक महापालिका रुग्णालयात (सायन रुग्णालय) आता मोठ्या प्रमाणावर बालकांवर अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लांट) करण्यात येणार आहे. धारावी येथील एकनाथ गायकवाड अर्बन हेल्थ सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या नव्या विस्तारित बीएमटी केंद्राचे उद्‌घाटन रुग्णालय प्रशासन नोव्हेंबर महिन्यात करणार आहे.
या उपक्रमामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेत बाल्यावस्थेतील कर्करोग आणि रक्तविकारांच्या उपचारांना बळ मिळणार आहे. या केंद्रामुळे आतापर्यंतच्या तुलनेत सायन रुग्णालयात वार्षिक ४०० टक्के म्हणजेच सुमारे १२० बालकांचे बोन मॅरो प्रत्यारोपण होण्याची शक्यता आहे.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले की, बीएमटी विभागाची क्षमता दोन खाटांवरून आठ खाटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या विस्तारित केंद्रासाठी सिप्ला कंपनीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत केली असून, पुढील १० वर्षांपर्यंत उपचारासाठी लागणारा खर्चही सिप्ला उचलणार आहे. वर्ष २०१५ पासून सायन रुग्णालयात आतापर्यंत १०४ बालकांचे बोन मॅरो प्रत्यारोपण करण्यात आले असून, त्यापैकी ९३ टक्के उपचार यशस्वी ठरले आहेत.
नव्या केंद्रामुळे प्रतीक्षा कालावधी कमी होणार असून, अधिकाधिक बालकांना जीवनरक्षक उपचार मिळू शकतील. आतापर्यंत सुविधा मर्यादित असल्याने अनेक रुग्णांना वाडिया रुग्णालय, टाटा मेमोरियल रुग्णालय आणि बोरीवलीतील महापालिकेच्या बीएमटी केंद्रात पाठवावे लागत होते, जिथे प्रतीक्षा यादी मोठी असते. सायन रुग्णालयाचे विस्तारित केंद्र सुरू झाल्यानंतर या प्रतीक्षेत लक्षणीय घट होणार आहे.

गरीब कुटुंबांसाठी दिलासा
सायन रुग्णालयातील विस्तारामुळे विशेषतः कमी उत्पन्न गटातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासगी रुग्णालयांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणाचा खर्च २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत जातो, त्यामुळे धारावीसारख्या भागातील रुग्णांसाठी ही सुविधा जीवनदायी ठरणार आहे. डॉ. जोशी यांनी सांगितले की, बीएमटी प्रक्रियेत कर्करोगग्रस्त बोन मॅरो काढून त्याऐवजी आरोग्यदायी पेशी प्रत्यारोपित केल्या जातात.

कोणत्या आजारांसाठी बीएमटी उपयोगी?
ल्यूकेमिया (रक्ताचा कर्करोग), सिकल सेल, थॅलेसिमिया, अप्लास्टिक अ‍ॅनिमिया तसेच आनुवंशिक मेंदू विकार अशा ५० पेक्षा जास्त गंभीर आजारांवरील उपचारात बीएमटी प्रभावी ठरतो. या उपचारानंतर ७० ते ७५ टक्के रुग्ण पूर्णपणे रोगमुक्त होतात. रुग्णाच्या भावंडांकडून किंवा पालकांकडून अस्थिमज्जा दान करून हा उपचार शक्य असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com