सदावर्ते, शिंदे गटात हाणामारी
सदावर्ते - शिंदे गटात हाणामारी
एसटी बँकेच्या संचालक बैठकीत गोंधळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता १५ : मुंबईत बुधवारी झालेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत भ्रष्टाचार, बेकायदा कामे तसेच गैरवर्तणुकीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून, कर्मचारी संघटनांनी संताप व्यक्त केला.
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची बँक असलेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दोन्ही गटांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. भ्रष्टाचार, बेकायदा कामे आणि गैरवर्तणुकीच्या मुद्द्यावरून जोरदार वाद निर्माण झाला. दोन्ही गटांनी एकमेकांवर बाहेरून लोक बोलावून मारहाण केल्याचा आरोप केला. मागील दोन वर्षांपासून बँकेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरू आहे. आम्ही याबाबत सहकार आयुक्त आणि अध्यक्षांकडे तक्रारी केल्या आहेत. आज आम्ही पळून गेलो नसतो तर आमचा जीव गेला असता. गुणरत्न सदावर्ते सातत्याने बँकेत घोटाळे करीत असून या हल्ल्यामागे त्यांचा हात आहे, असा आरोप एसटी बँकेचे संचालक सदस्य संतोष राठोड यांनी केला. एसटी बँकेत १२५ कर्मचाऱ्यांच्या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. त्यावर आम्ही संघटनेच्या माध्यमातून स्थगिती आणली; तरीही त्यांनी भरती सुरूच ठेवली. एसटी बँकेत १२ कोटींचे एक सॉफ्टवेअर त्यांनी थेट ५२ कोटींना खरेदी केले, असाही आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला.
==
एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलने अनेक गैरव्यवहार केले. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून भ्रष्टाचार केला आहे. त्याला कंटाळून त्यांचे काही सदस्य आमच्याकडे आले.
- आनंदराव अडसूळ, नेते, शिवसेना शिंदे गट
===
एसटी बँकेत नोकर भरतीत तसेच संगणक खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सदावर्ते पॅनेलने हा गोंधळ केला आहे. त्यामुळे बँकेवर तत्काळ प्रशासक नेमणे आवश्यक आहे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस
====
सौरभ पाटील एमडी असताना १२ कोटींच्या डेटा एन्ट्री कामात ३० कोटींचा भ्रष्टाचार झाला. तो प्रकार उघड होऊ नये, म्हणूनच हा पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना
----
विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला. त्यामुळे हा वाद निर्माण झाला. अनेक गंभीर कृत्ये त्यांच्या संचालकांनी केली आहेत.
- संजय घाटगे, संचालक, एसटी बँक, सदावर्ते पॅनेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.