दिवाळीत गोडावर ठेवा नियंत्रण
दिवाळीत गोडावर ठेवा नियंत्रण
शरीरावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः दिवाळी म्हटले की सर्वात पहिले आकर्षण असते ते म्हणजे फराळाचे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या फराळावर बेतानेच ताव मारण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ आणि मधुमेहतज्ज्ञांनी दिला आहे. दिवाळीत बाहेरील तयार पदार्थ विकत घेणे टाळणे गरजेचे असून घरीच केलेले पदार्थ आरोग्यदायी ठरतील, असा सल्लाही दिला जात आहे.
एखादा पदार्थ जास्त आवडतो म्हणून त्याचे अतिसेवन करू नये. नेमक खा; पण आरोग्यदायी खा, असा सल्ला पालिका आणि सरकारी रुग्णालयातील आहारतज्ज्ञ देत आहेत. आहारतज्ज्ञ मंजुषा मोरे यांनी सांगितले, की दिवाळीचे वातावरण असून खमंग फराळाचा सकाळी आणि संध्याकाळी नाश्ता केला जातोय.
मुंबईत असंसर्गजन्य आजारांचा आलेख चढता आहे. यात मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने बहुतांश मुंबईकर ग्रस्त आहेत. यातून मुंबईकरांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दिवाळीतील फराळाबाबत मुंबईकरांना बिनधास्त खा, असा सल्ला देता येत नाही. खा पण मोजकेच खा, असे मोरे यांनी सांगितले.
सणांच्या काळात विशेषत: दिवाळीत मधुमेहाच्या रुग्णांचे नियंत्रण सुटते आणि बेफिकीर खाणे, दारू पिणे, अपुरी झोप आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. दिवाळीनंतर किमान १० ते १५ मधुमेहाचे रुग्ण दिसत आहेत. त्यांना आहार आणि औषधांबद्दल समुपदेशन आवश्यक आहे. कधी कधी, त्यांना इन्सुलिन घेणेदेखील सुरू करावे लागते, अशी माहिती आहारतज्ज्ञ मंजुषा मोरे यांनी दिली.
हे पदार्थ खाल्ले तरी चालतील...
फराळातील भाजणीची चकली विविध डाळींच्या पीठाने तयार केली जाते; पण ही चकली थोड्या प्रमाणात खाणे आवश्यक आहे. आपला पारंपरिक आहार ऋतुमानानुसार असतो. गणपतीच्या दिवसांत उकडीचे मोदक तर दिवाळीच्या काळातील तयार करण्यात येणारा फराळ हा शरीराला ऊर्जा देणारा असतो; पण हे सर्व पदार्थ ताव मारून खाऊ नये. मधुमेही आणि उच्च रक्तदाब रुग्णांनी पथ्य पाळणे आवश्यक आहे. सतत फराळ खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ होणे, पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात.
गूळ आणि मधाने भरलेल्या मिठाई निवडा
गूळ, मध आणि खजूर वापरून बनवलेल्या मिठाई निवडा. तसेच नारळाचे लाडू, खजूर आणि काजू वापरून पाहा. नैसर्गिक गोड पदार्थांनी बनवलेल्या या मिठाई ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत आहेत.
योग्य वेळ निवडा
रिकाम्या पोटी गोड पदार्थ खाणे टाळा. जेवणानंतर १५-२० मिनिटे गोड पदार्थ खावेत. सकाळी किंवा दुपारी उत्तमच. जर तुम्ही संध्यकाळी गोड पदार्थ खाल्ले तर १०-१५ मिनिटे चाला.
कोमट पाणी घ्या
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. त्याऐवजी कोमट पाणी किंवा हर्बल पेये वापरून पाहा. त्यामुळे गॅस आणि पोटाच्या समस्या टाळण्यास मदत होईल.
तुकडे करून खा
संपूर्ण मिठाईचा तुकडा खाण्याऐवजी अर्धा किंवा चतुर्थांश मिठाई खाल्ली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेता येईल आणि तुमच्या कॅलरीजचे प्रमाण मर्यादित होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.