पावसामुळे मिसिंग लिंकला विलंब!
पावसामुळे मिसिंग लिंकला विलंब!
जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा; केबल स्टे ब्रिजच्या कामाला वेग
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः मुंबई-पुणेदरम्यानच्या प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) उभारत असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाला पावसामुळे विलंब होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याबाबत बजावले होते; मात्र धुवाधार पाऊस आणि दरीतून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे कामाच्या वेगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होण्यास जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने बोरघाटात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. ती फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून खोपोली ते कुसगावदरम्यान १३.५ किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक प्रकल्प उभारला जात आहे. त्यानुसार साडेसहा किमी लांबीच्या तीन पदरी द्रुतगती मार्गाचे चौपदरीकरण व दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून केबल स्टे ब्रिज उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबरअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र मागील पाच महिन्यांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे कामाचा वेग मंदावला होता. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरची मुदत पाळणे शक्य नसल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने महिनाभरापासून केबल स्टे ब्रिजच्या कामाने पुन्हा वेग घेतला असून जानेवारी- फेब्रुवारीअखेर हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे.
---
२८ मीटर खोल पाया
मिसिंग लिंकवर दोन व्हायडक्ट आहे. एक व्हायडक्ट ८५० मीटर लांबीचा असून त्याचे काम पूर्ण झाले आहे, तर दुसरा व्हायडक्ट सुमारे ६०० मीटर लांबीचा असून जवळपास १८२ मीटर उंची आहे. या ठिकाणी दरीत ताशी १८० किलोमीटर वेगाने वारा वाहतो. पावसाचे प्रमाणही जास्त असलेल्या ठिकाणी हा केबल स्टे ब्रिज उभारला जात असल्याने त्याचा पाया तब्बल २८ मीटर खोलीपर्यंत आहे. त्यामुळे या पुलाचे काम मजबूत होणार असून, त्यावरून ताशी १०० किलोमीटर वेगाने वाहने चालवणे शक्य होणार आहे.
---
पावसामुळे केबल स्टे ब्रिजच्या कामावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे काम मंदावले होते. आता मात्र पाऊस थांबल्यापासून कामाने वेग घेतला आहे.
- डॉ. अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

