राणीबागेत वाढलेल्या पेंग्विन कुटुंबासाठी नवी जागा!

राणीबागेत वाढलेल्या पेंग्विन कुटुंबासाठी नवी जागा!

Published on

राणी बागेत वाढलेल्या पेंग्विन कुटुंबासाठी नवी जागा!
महापालिकेचा विस्तार प्रकल्प सुरू; ४० पेंग्विनची व्यवस्था शक्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय (राणी बाग) येथील पेंग्विन कुटुंब झपाट्याने वाढत असून, आता या थंड प्रदेशातील पाहुण्यांसाठी महापालिकेकडून नव्या निवासस्थानाचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात एकूण २१ पेंग्विन आहेत. सध्याच्या वसाहतीत कमाल २५ पेंग्विनपर्यंतच व्यवस्था शक्य आहे. त्यामुळे वाढत्या पेंग्विन संख्येनुसार नव्या विस्ताराची गरज भासू लागली आहे.
२०१६मध्ये दक्षिण कोरियातून सात पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर गेल्या १० वर्षांत त्यांची संख्या तब्बल तीनपट वाढली आहे. सध्याचे पेंग्विन घर पूर्णपणे वातानुकूलित असून ते दक्षिण ध्रुवीय वातावरणाची प्रतिकृती तयार करते. हे पेंग्विनच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नव्या प्रकल्पांतर्गत विद्यमान पेंग्विन हाउसची जागा ८०० चौरस फुटांनी वाढविण्यात येणार आहे. या विस्तारानंतर एकूण ४० पेंग्विनपर्यंत व्यवस्था शक्य होईल.
महापालिकेने याच वर्षी राणी बागेत टनेल अ‍ॅक्वेरियम प्रकल्पाची कामे सुरू केली असून, त्याचा एकूण खर्च ६२ कोटी रुपये इतका आहे. त्याच प्रकल्पांतर्गत पेंग्विन वसाहतीचा विस्तार सुमारे एक कोटी रुपयांत होणार आहे. डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले, की विस्ताराचे काम सुरू असताना काही काळ पेंग्विन हाउस बंद ठेवावे लागेल. त्यामुळे २०२६च्या पावसाळ्यात राणी बागेत लोकांची गर्दी कमी असते तेव्हा हे काम पूर्ण करण्याचा आमचा विचार आहे.
वाढत्या पेंग्विन संख्येमुळे महापालिकेने देशातील इतर प्राणिसंग्रहालयांशी देवाणघेवाणीची योजना आखली होती. मात्र पेंग्विनच्या भरमसाठ देखभाल खर्चामुळे इतरत्र कुणीही या देवाणघेवाणीत रस दाखवला नाही.
यावर्षी मार्च महिन्यात तीन पेंग्विन पिल्लांचा जन्म झाला होता. ही पिल्ले काही महिन्यांनी सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुल्या वसाहतीत दाखल करण्यात आली. त्यामुळे आता राणी बागेतील पेंग्विन कुटुंब अधिक रंगतदार झाले असून, मुंबईकरांसाठी या थंड प्रदेशातील पाहुण्यांना नव्या रूपात पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे.

आगामी काही वर्षांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने मोठ्या वसाहतीची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यमान पेंग्विन हाउसचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
- डॉ. संजय त्रिपाठी,
संचालक, प्राणिसंग्रहालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com