मुंबई बॉम्बस्फोट कट शिजला ते घर निघणार लिलावात
मुंबई बॉम्बस्फोट कट शिजला ते घर निघणार लिलावात
मेमनसह कुटुंबाच्या १७ मालमत्ता यादीत
मुंबई, ता. ७ ः मुंबई बॉम्बस्फोट मालिकेच्या (१९९३) कटास आकार देणारा माहीमच्या अल हुसैनी इमारतीतील सदनिका लिलावात निघणार आहे. ती बॉम्बस्फोट मालिका घडवणाऱ्या मुख्य सूत्रधार कुख्यात टायगर मेमनच्या मालकीची आहे.
तस्कर आणि विदेशी चलन कूटव्यवहारी (संपत्तीचे समपहरण) अधिनियम प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकरपाठोपाठ टायगर व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शहरातील मालमत्ता लिलावात काढण्याची तयारी जवळपास पूर्ण केली असून डिसेंबर महिन्यात लिलाव होऊ शकेल. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विशेष टाडा न्यायालयाने टायगर व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या १७ मालमत्तांची माहिती दिली आहे. त्यातील आठ मालमत्तांचा ताबा प्राधिकरणाने घेतला असून उर्वरित पाच मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून चार मालमत्तांबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत. प्राधिकरणाने लिलावासाठी ताब्यात घेतलेल्या आठ मालमत्तांमध्ये अल हुसैनी इमारतीतील तीन सदनिकांचा समावेश आहे. त्यातील एका सदनिकेत टायगर आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्य करीत होता. विशेष म्हणजे, याच घरात १९९३मध्ये शहरातील पहिल्या भयंकर अशा बॉम्बस्फोट मालिकेने आकार घेतला. बॉम्बस्फोटांचा कट तडीस नेण्यासाठी या घरात अनेक बैठका, खल घडले होते.
...
या मालमत्तांचा समावेश
टाडा न्यायालयाकडून लिलावासाठी प्राधिकरणास देण्यात आलेल्या टायगर व कुटुंबीयांच्या मालमत्तांच्या यादीत वाकोला येथील दहा हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे. या भूखंडाची आजच्या बाजारभावानुसार सुमारे ४०० कोटी इतकी किंमत असावी. सध्या या भूखंडावर अतिक्रमण झाले आहे. त्याव्यतिरिक्त झवेरी बाजार, वांद्रे, कुर्ल्यातील कपाडिया नगर आणि मनीष मार्केट येथील दोन सदनिका आणि चार दुकाने या यादीत आहेत.
...
परदेशात पलायन
१९९२-९३च्या जातीय दंगलींमध्ये टायगर मेमनचे माहीम येथील दुकान जाळण्यात आले होते. त्याचा बदला म्हणून टायगरने बॉम्बस्फोट मालिकेचा कट आखला. माहीममधील हातावर पोट असलेल्या तरुणांची माथी भडकावली. त्यांना दहशतवादी कृत्यांच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये पाठवले. कुख्यात तस्कर मुस्तफा डोसाकरवी आरडीएक्स, शस्त्रसाठा गुजरात आणि रायगडच्या किनाऱ्यावर उतरवून घेतला. पुढे याच तरुणांकडून माहीममध्येच बॉम्ब बनवून घेतले. ज्या दिवशी बॉम्बस्फोट मालिका घडली त्याच्या आदल्या दिवशी ११ मार्च १९९३ रोजी सर्व कुटुंबासह टायगर परदेशात पळून गेला.
...
टायगरचे नाव असे उघड झाले
शहरात १२ मार्च १९९३ रोजी बॉम्बस्फोट मालिका घडली. त्या गडबडीत वरळी परिसरात तपकिरी रंगाची मारुती ओमनी कार बेवारस सापडली. वरळी पोलिसांच्या तपासणीत त्यात शस्त्रसाठा आणि स्फोटके आढळली. ही कार टायगरची पत्नी रुबिनाच्या नावे असल्याची माहिती आरटीओकडून प्राप्त होताच पोलिस त्या दिवशी रात्री दहाच्या सुमारास अल हुसैनी इमारतीतील टायगरच्या घरी धडकले. घर बंद असले तरी हे कुटुंब काही तासांपूर्वीच पसार झाल्याच्या खाणाखुणा पोलिसांना आढळल्या. पुढे हेच घर १९९३ बॉम्बस्फोट मालिकेच्या तपासाचे प्रमुख केंद्र बनले.
...
घरात वृत्तपत्रे
प्राधिकरणाने काही महिन्यांपूर्वी टायगरचे घर उघडले होते. तेथे मार्च १९९३मधील वृत्तपत्रे आणि काही कागदपत्रे आढळली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

