म्हाडाच्या घरासाठी २५ वर्षापूर्वी विजेते ठरलेल्यांच्या गृहस्वप्नपूर्तीला आचारसंहितेचा खो!

म्हाडाच्या घरासाठी २५ वर्षापूर्वी विजेते ठरलेल्यांच्या गृहस्वप्नपूर्तीला आचारसंहितेचा खो!

Published on

म्हाडाच्या घरासाठी २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्यांच्या गृहस्वप्नपूर्तीला आचारसंहितेचा खो!
किमतींबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यावर मर्यादा; १५६ विजेत्यांना घरासाठी प्रतीक्षाच
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लाॅटरीत २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या तब्बल १५६ विजेत्यांच्या गृहस्वप्नपूर्तीला विलंब लागणार असल्याची चिन्हे आहेत. सध्या संबंधितांसाठी म्हाडाने राखीव ठेवलेल्या घरांच्या किमती ५० लाखांच्या घरात आहेत, मात्र विजेत्यांचा घराचा हक्क जुना असल्याने त्यांच्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याची तयारी म्हाडाने दर्शवली आहे, पंरतु सध्या राज्यात नगरपालिका निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने त्याबाबत निर्णय घेण्यावर म्हाडा प्राधिकरणावर मार्यादा आहेत. त्यामुळे तूर्तास विजेत्यांना घरासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्याने लाॅटरी काढल्या जातात. त्याचप्रमाणे कोकण मंडळाने २००० मध्ये काढलेल्या लाॅटरीत चितळसर ठाणे येथील अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील २०० घरांचा समावेश होता. त्यानुसार अर्ज केलेल्या १५६ जणांना येथील योजनेमध्‍ये घरे लागली खरी, पण या भूखंडावर आरक्षण असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत ठाणे महापालिकेने घरांच्या प्रकल्पाला परवानगी नाकारली होती. दरम्यान, म्हाडाच्या लाॅटरीत विजेते ठरलेल्या अर्जदारांना म्हाडाने त्यांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम परत केली नव्हती. त्यामुळे ते घराच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, कोकण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या घरांच्या लाॅटरीत तत्कालीन विजेत्यांसाठी चितळसर येथील घरे राखीव ठेवली होती, मात्र त्यांच्या किमती ५० लाखांच्या घरात होत्या, तर २००० मध्ये काढलेल्या लाॅटरीच्यावेळी तुलनेने घरांच्या किमती खूपच कमी होत्या. त्यामुळे आताच्या किमतींनुसार घर घेणे आमच्या आवाक्याबाहेर असल्याने म्हाडाने आमचा सहानभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी विजेत्या अर्जदारांनी म्हाडाकडे केली आहे.
म्हाडा प्राधिकरणाने सुमारे ३६ लाख रुपयांपर्यंत किमती कमी करण्याचे विजेत्यांना अश्वासन देतानाच त्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाला पाठवावा असे स्पष्ट केले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करून प्राधिकरणाकडे गेला आहे. त्याचवेळी नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागली आहे. म्हाडा प्राधिकरणाचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर असल्याने किमती कमी करण्याचा निर्णय घेणे शक्य नसल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

ऑनलाइन अर्ज भरावे लागणार
म्हाडाच्या घरांसाठी २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्यांचा घराचा दावा कायम आहे. त्यानुसार त्यांच्यासाठी चितळसर येथे एक इमारत राखीव ठेवली आहे, पण त्यांना सदनिका निश्चिती झालेली नाही. त्यामुळे सदनिका निश्चित करता यावी, यासाठी संबंधितांकडून ऑनलानइ अर्ज भरून सिस्टीममध्ये घ्यावे लागेल. त्यानंतर लाॅटरी काढून सदनिका निश्चिती केली जाईल, मात्र जोपर्यंत घरांच्या किमतींबाबतचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पुढील प्रक्रिया पुढे जाऊ शकणार नाही.

काय आहे किमतीचा प्रश्न?
–म्हाडाने २००० मध्ये काढलेल्या लाॅटरीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या १४३ चौरस फुटांच्या घराची किंमत केवळ ६५ हजार रुपये होती, तर अल्प उत्पन्न गटातील २१५ चौरस फुटांच्या घराची एक लाख ८७ हजार ५०० रुपये एवढी कमी किमत होती, मात्र आता म्हाडाने विक्रीसाठी काढलेल्या चितळसर येथील अल्प उत्पन्न गटातील सुमारे ३५० चौरस फुटांच्या घराच्या किमती ५० लाखांच्या घरात आहेत. त्यामुळे आताच्या किमतीनुसार घर घेणे तत्कालीन विजेत्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
–- म्हाडाकडून १५६ विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. त्यासाठी २०२१ ची घरांची किंमत आधारभूत मानून त्यावर सुमारे चार टक्के व्याज आकारून घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे सुमारे ५० लाख रुपये किमतीचे घर ३५-३६ लाख रुपयांमध्ये मिळू शकणार आहे.

चितळसर येथील घरांसाठी याआधीच विजेते ठरलेल्यांना दिलासा देण्यासाठी घरांच्या किमती कमी करण्याबाबतचा प्रस्ताव म्हाडा प्राधिकरणाकडे पाठवला आहे. त्याबाबत निर्णय घेण्याकरिता सध्या लागू असलेल्या नगरपालिका निवडणूक आचारसंहितेची अडचण येईल, असे वाटत नाही.
– विशाल राठोड, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ (म्हाडा)

Marathi News Esakal
www.esakal.com