काँग्रेसचा स्वबळाचा नारा ‘आत्मघातकी’

काँग्रेसचा स्वबळाचा नारा ‘आत्मघातकी’

Published on

काँग्रेसचा स्वबळाचा नारा ‘आत्मघातकी’
विश्लेषकांचा इशारा; काँग्रेस-मनसे अजूनही संभ्रमात


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : मुंबई महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने एकटा चलोचा नारा दिला आहे. ‘काँग्रेसचा स्वबळाचा निर्णय म्हणजे राजकीय आत्मघात’ असा इशारा राजकीय तज्ज्ञांनी दिला आहे. ‘मविआ’मधील गोंधळ आणि फूटही भाजपला फायदा देईल, असे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


‘मविआ’मधील फूटही भाजपला ‘फायदा’ देईल, असे मत ज्येष्ठ राजकीय विष्लेषक प्रताप आसबे यांनी व्यक्त केले. याबाबत आसबे म्हणाले की, ‘बिहारचा निकाल हा मोठा धडा आहे. शिवसेना (ठाकरे गट), मनसे, काँग्रेस हे एकत्र आले, तर मुंबईचे चित्र बदलू शकते.’ मुस्लिम-दलित मते आता पूर्णपणे काँग्रेसच्या ताब्यात नाहीत, असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटते. देसाई यांनी याबाबत विश्लेषण करताना सांगितले की, ‘मुंबईतील मुस्लिम आणि दलित मते आज काँग्रेसची मक्तेदारी राहिलेली नाही. समाजवादी पक्ष, वंचित, ठाकरे गट सर्वांनी ही मते आपल्याकडे वळवली आहेत. काँग्रेसने स्वबळाचा हट्ट धरल्याने ही मते विभागली जातील आणि त्याचा थेट फायदा भाजपला मिळेल.’ दुसरीकडे ‘स्वबळाचा नारा म्हणजे राजकीय सुसाईड नोट!’ असे परखड मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईनकर यांनी मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘काँग्रेसने आघाडी सोडली, तर ते स्वतःचेच नुकसान करतील. बिहारने हे सिद्ध केले आहे. राज ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी भेट आणि राज ठाकरे यांनी केलेले काँग्रेसचे कौतुक, हे मुद्दे काँग्रेसने मांडावे.’ असेही माईणकर म्हणाले. इतकेच नाही तर ‘कोणताही मुद्दा अधिक न ताणता मिळेल त्या जागा पदरात पाडून घ्याव्यात अन्यथा काँग्रेसला महापालिका निवडणुकीत मोठा फटका बसेल.’ असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काँग्रेसची ‘दबक्या आवाजातील’ वेगळीच भूमिका!.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘प्रत्येक निवडणूक स्वतंत्र असते. बिहारचा निकाल महाराष्ट्रात लागू करणे चूक आहे. मुंबईत काँग्रेसची स्वतःची ‘व्होट बँक’ आहे, तसेही ठाकरे गट किंवा मनसे यांच्यामुळे आम्हाला काही विशेष फायदा होत नाही’

..
तिढ्यात आणखी वाढ
मनसेच्या बाजूनेही अधिकृत भूमिका जाहीर नाही. महापालिका निवडणूक कार्यक्रम अजूनही जाहीर झालेला नाही, पण काँग्रेस-मनसेच्या ‘दबक्या पावलांमुळे’ महाविकास आघाडीत गोंधळ वाढणार असल्याचे स्पष्ट दिसते. राजकीय विश्लेषकांच्या मतांनुसार काँग्रेस आणि मनसे अद्याप स्प्षट भुमिका घेतांना दिसत नाही. परिणामी महाविकास आघाडीतील तिढा आणखी वाढत असून, त्याचा थेट फायदा भाजप महायुतीला होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com