ऐतिहासिक वांद्रे तलाव समस्यांच्या विळख्यात!
ऐतिहासिक वांद्रे तलाव समस्यांच्या विळख्यात!
जॉगिंग ट्रॅक उखडलेला, विजेचे दिवे, लोखंडी रेलिंग चोरीला; भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर
मयूर फडके ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : वांद्रे पश्चिमेतील येथील जवळपास २०० वर्षे जुना आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या स्वामी विवेकानंद तलावाची अवस्था बिकट झाली आहे. विविध समस्यांच्या विळख्यात हा तलाव सापडला असून, एकेकाळी वांद्र्यातील पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या या तलावाकडे पुन्हा लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
एस. व्ही. रोडवरील या तलावाचे २०१६ ते २०१९ या काळात सुशोभीकरण करण्यात आले होते, मात्र पुन्हा या तलावाची परिस्थिती जैसे थेच झाली आहे. तलावाचे सुशोभीकरण करताना हजारो टन कचरा, प्लॅस्टिक, गाळ काढून टाकण्यात आला होता. तलावाच्या चारही बाजूने रेलिंग, जॉगिंग ट्रॅक, विजेचे दिवे, म्यूझिकल कारंजे लावले होते, मात्र कोरोनादरम्यान, या तलावाकडे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून पालिकेने आपल्या ब श्रेणीतील या वारसा स्थळाकडे पाठ फिरवली आहे. या तलावाच्या परिसरात गर्द झाडी असून, दिवसभर भिकारी, गर्दुल्यांचा वावर असल्याने हा परिसर असुरक्षित झाला आहे.
तलावात कचरा तसाच पडून असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा खाल्ल्यामुळे तलावातील माशांचा मृत्यू होतो. त्यामुळे तलावातून दुर्गंधी पसरते आणि त्या दुर्गंधीत राहणे जिकिरीचे बनते, असा दावा तलावाला लागून असणाऱ्या इमारतींच्या रहिवाशांनी केला आहे. पोलिसांकडून गस्त घातली जाते, तरीही त्यांची नजर चुकवून इथे गैरकृत्य घडत असल्याचा दावाही स्थानिकांनी केला आहे.
रात्रीच्यावेळी असुरक्षितता
तलावाच्या सभोवताली रहिवाशांना फिरता यावे, यासाठी जॉगिंग अथवा वॉकिंग ट्रॅक बांधला होता, परंतु त्याचीही दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी ट्रॅकमध्ये भेगा पडल्या आहेत. ट्रॅकवर लावलेल्या टाईल्स उखडल्या आहेत. पावसाळ्यात त्यामध्ये पाणी साचल्यामुळे त्यातून मार्ग काढणे कठीण होऊन बसते. संपूर्ण तलावाच्या सभोवताली दिवे लावून तलावाची शोभा वाढविण्यात आली होती. सुरुवातीला काही महिने ते सुरू होते, परंतु त्याची चोरी झाली असून, आता खांब उभे आहेत. तलाव संपूर्णतः अंधारात असल्यामुळे रात्रीच्यावेळी तलावाच्या आजूबाजूने जाणे भीतीदायक आणि असुरक्षित झाले आहे.
कबुतरांचा वावर
एकीकडे कबुतरांना खाणे टाकण्यास मनाई असतानाही इथे सर्रासपणे कबुतरांना खाणे टाकले जाते. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्यांचाही त्रास सहन करावा लागत आहे. दुसरीकडे, तलावाच्या सभोवताली लावलेल्या लोखंडी रेलिंग चोरून नेले आहे. तलावात कोणी पडून दुर्घटना होऊ नये, यासाठी ताप्तुरत्या दोऱ्या लावण्यात आल्या आहेत.
तलावाची नीट काळजी न घेतल्यामुळे घाण वास येतो. ठिकठिकाणी गर्दुल्ले बसलेले आढळतात. दिवे बंद असल्यामुळे काळोख असतो. त्याचाच फायदा उचलून रात्रीच्यावेळी तिथे दारू पार्ट्या चालतात.
- विशाल सुर्वे, स्थानिक रहिवासी
सुशोभीकरणानंतर तलावाचे गेलेले वैभव परत मिळाले असे वाटले होते, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती बिकट आहे. अमली पदार्थांचे सेवन, देवाण-घेवाण चालते. सर्रास चोरी, लूटमार चालते, जवळच राहणारे तलावात कचरा टाकून तो प्रदूषित करतात.
- अनिकेत नाईक, स्थानिक रहिवासी
प्रदूषणामुळे तलावाचे पाणी हिरवे झाले आहे. त्यामुळेच पाण्यातील प्राणवायूची पातळी घसरली असून, मासे दगावत आहेत. शुद्धीकरणासंदर्भात पालिकेकडे पाठपुरावा केल्यावर निविदा प्रक्रियेचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते, प्रत्यक्षात मात्र सर्व काही कागदावर असून, नैसर्गिक जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहे.
- आसिफ झकेरिया, माजी नगरसेवक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

