‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल!

‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल!

Published on

‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल!
८३ घरांच्या माध्यमातून मिळणार ९६ कोटी रुपये
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : वरळी-शिवडी कनेक्टरसाठी ‘एमएमआरडीए’कडून एल्फिन्स्टन येथे उभारण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलामुळे येथील दोन इमारतींमधील ८३ घरे बाधित होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए म्हाडाच्या माध्यमातून संबंधित रहिवाशांना दादर, प्रभादेवी, वडाळा, अँटाॅप हिल परिसरात घरे देणार आहे. त्यामुळे रहिवाशांना हक्काची घरे मिळणार असून, म्हाडालाही यातून उत्पन्न मिळणार आहे. रेडिरेकनर दराच्या तब्बल ११० टक्के दराने या घरांची किंमत आकारली जाणार असल्याने म्हाडाला तब्बल ९६ कोटी ८२ लाख रुपये एकरकमी मिळणार असल्याचे समोर आले आहे.

एल्फिन्स्टन येथे उभारल्या जाणाऱ्या पुलाच्या कामामुळे बाजूलाच असलेल्या हाजी नुरानी आणि लक्ष्मी निवास या दोन इमारती बाधित होणार आहेत. लक्ष्मी निवास या इमारतीत ६० तर हाजी नुरानी या इमारतीत २३ रहिवासी आहेत. संबंधित रहिवाशांनी आपल्याला आहे त्याच परिसरात घरे मिळावीत, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने एमएमआरडीएने म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या मालकीची असलेली घरे या रहिवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार म्हाडाने दादर, प्रभादेवी, माहीम, माटुंगा, वडाळा, अँटाॅप हिल येथील सुमारे ११९ घरे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दाखवली होती. त्यापैकी ८३ घरे संयुक्त पाहणीत अंतिम करण्यात आली. त्यानुसार म्हाडाने या घरांची दुरुस्ती केली आहे. या घरांच्या माध्यमातून म्हाडाला ९६ कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळणार असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


आधी पैसे, मगच घरांचा ताबा
‘एमएमआरडीए’ने दिलेल्या माहितीनुसार म्हाडाने सर्व ८३ घरांची दुरुस्ती केली आहे. तसेच रेडिरेकनरच्या ११० टक्के दराने ही घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या घराचे किती क्षेत्रफळ आहे, त्याची किंमत किती होत आहे, याबाबतची माहिती काढली असून, लवकरच त्याबाबत एमएमआरडीएला पत्र दिले जाणार आहे. दरम्यान, दोन्ही सरकारी संस्था असल्या तरी एमएमआरडीएने आधी घरांचे पैसे भरल्यानंतरच घरांचा ताबा दिला जाईल, अशी भूमिका म्हाडाने घेतली आहे.
------
वडाळ्याच्या घराची किंमत दोन कोटी सहा लाख रुपये
म्हाडाकडून एमएमआरडीएला दिल्या जाणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ ३०० ते ७०० चौरस फूट एवढे आहे. त्यानुसार बहुतांश घरे एक ते सव्वा कोटी रुपये किमतीची आहेत, तर वडाळा अँटाॅप हिल येथील आनंद हाईट येथील घराची किंमत सर्वाधिक दोन कोटी सहा लाख रुपये असून, त्याचे चटई क्षेत्रफळ ७५२ चौरस फूट आहे.

सर्वाधिक किंमत असलेली घरे
ठिकाण किमत (आकडेवारी कोटीमध्ये)
आनंद हाईट, वडाळा - २.६
अबेरो हाउस, दादर खेड गल्ली - १.७८
पारसमणी को-ऑप सोसायटी, दादर - १. ६१
पीएफ क्र. ३९७, शितला देवी मंदिरानजीक, माहीम - १.५२
इमारत क्र. २९, दादर - १.५०
श्रीनिवास टाॅवर, लोअर परेल - १.३४
इमारत क्र. २६, प्रभादेवी - १. २९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com